Nashik Drishyam Crime : नाशिकमध्ये (Nashik) टर्म इन्शुरन्सचे चार कोटी रुपये हडपण्यासाठी एका टोळीने अपघाताचा बनाव रचत आठ महिन्याच्या काळात दोन जणांचा खून (Murder) केल्याच्या खळबळजनक घटना जवळपास पंधरा महिन्यानंतर उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे दृश्यम चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल असा संपूर्ण कट या टोळीने रचला होता.    


नाशिकच्या देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरात राहणाऱ्या अशोक भालेराव या ईसमाचा 2 सप्टेंबर 2021 ला त्याच्याच 6 साथीदारांनी मारहाण तसेच अंगावर गाडी खालून खून केला होता, खूनाचा संशय येऊ नये म्हणून हा अपघात असल्याचा बनावही रचण्यात आला होता. अशोकच्या नावावर असलेल्या विविध सहा कंपनीच्या टर्म इन्शुरन्सचे चार कोटी रुपये हडपण्यासाठीच हे सर्व कृत्य करण्यात आले होते. या आरोपींमधील एका महिलेने बोगस कागदपत्र तयार करत मयत अशोकची पत्नी असल्याचं दाखवत हे सर्व पैसे एका बँक अकाउंटमध्ये वळती केले होते. दोन आठवड्यापूर्वी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले होते, मुंबई नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन सहाही आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात पोलीस अधिक खोलवर गेले असता आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलय. अशोकचा खून करण्याच्या जवळपास आठ महिन्यांपूर्वी म्हणजेच 26 जानेवारी 2021 ला याच घटनेतील काही आरोपींनी आणखी एका व्यक्तीचा अशोक प्रमाणेच खून करत अपघाताचा बनाव रचला होता.


26 जानेवारी 2021 ला रात्री अकरा वाजेच्या सुमारास यातील काही आरोपींनी गोदाकिनारी जात एका फिरस्त्याचा शोध घेतला, त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत त्यांनी दारू पाजली त्यानंतर एका लाल रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत त्याला बसवून जवळपास आठ किलोमीटर अंतरावर म्हसरूळ आडगाव लिंकरोडवर येऊन या रस्त्यावर फेकून देण्यात आले त्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी चालवण्यात येऊन त्याचा खून करण्यात आला. हा संपूर्ण अपघाताचा बनाव त्यांनी रचला होता याबाबत म्हसरुळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती.


दरम्यान हत्या करण्यात आलेल्या संबंधित व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून याप्रकरणी  म्हसरूळ पोलीस ठाण्यात अशोकच्याच खुनाच्या घटनेतील आरोपींवर काल रात्री खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींमध्ये मयत अशोक भालेरावचेही नाव आल्याने खळबळ उडाली असून गोदाकिनारी बसलेल्या त्या फिरस्त्याची हत्या करण्यामागील त्यांचा उद्देश ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल..


किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त म्हणाले कि, मुंबई नाका पोलीस ठाण्यात आपण आधी खूनाचा गुन्हा दाखल केला होता, मंगेश सावकार या आरोपीने इन्शुरन्सच्या पैशांसाठी प्लॅन करत अशोकचा खून केला होता. याच्या तपासात आरोपींना अटक केली होती. दरम्यान या तपासात असे निष्पन्न झाले होते की मंगेश सावकार आणि मयत अशोक भालेराव यांनी असा प्लॅन केला होता की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मारायचे आणि अशोक भालेराव मयत दाखवायचा. तो प्लॅन पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०२१ ला दारू पाजून अंगावर गाडी घालून एका फिरस्त्याचा खून केला होता त्यावरून म्हसरूळला आपण खूनाचा दुसरा गुन्हा दाखल केलाय. अनोळखी मयताची अद्याप ओळख पटलेली नाही बेवारस होता त्यावेळी म्हसरूळ अपघाती गुन्हा दाखल होता. त्यावेळी प्लॅन होता की त्या व्यक्तीला मारून तो अशोक दाखवायचा पण ते यशस्वी झाले नाही त्यामुळे त्यांनी नंतर अशोकलाच मारून त्याच्या विम्याचे पैसे क्लेम केले. आरोपींकडे अधिक तपास सुरु आहे.       


दरम्यान टर्म इन्शुरन्सचे चार कोटी रुपये हडपण्यासाठी या टोळीने अपघाताचा बनाव रचत अशाप्रकारे आठ महिन्याच्या काळात दोन जणांचा खून केल्याची घटना जवळपास पंधरा महिन्यानंतर उघडकीस आल्याने नाशकात खळबळ उडाली असून दृश्यम चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल असा हा संपूर्ण कट रचण्यात आला होता. मंगेश सावकार हा यातील मुख्य सूत्रधार असून त्याच्याकडून एक पिस्टल आणि काडतूसेही पोलिसानी हस्तगत केलीय. या आरोपींनी असे अजून किती खून करत अपघाताचे बनाव रचले आहेत ? मयत अनोळखी फिरस्ता इसम नक्की कोण होता ? टोळीचे अजून कोणी साथीदार आहेत का ? या संपूर्ण गोष्टींचा नाशिक पोलीस सध्या तपास करत आहेत.