Nashik News : नाशिकमधून (Nashik) अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली असून पेरु तोडण्यासाठी गच्चीवर गेलेल्या मायलेकीला विजेचा शॉक लागून दोघींचाही मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकजवळ ओझर (Ojhar) शहरात ही घटना घडली असून या घटनेत गच्चीवरील पाण्याची टाकी फुटून अख्ख्या बंगल्यात करंट पसरल्याने गच्चीवर येत असलेल्या जावई आणि दोन मुलांना पाण्याने बाजूला फेकल्याने ते सुदैवाने वाचले आहेत. मात्र या घटनेने कुटुंबांसह संपूर्ण ओझर शहरावर शोककळा पसरली आहे. 


सध्या अधिक मासाचा (Adhik Mas) महिना सुरु असल्याने अनेक पाहुण्यांच्या वर्दळ घराघरांत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आपली दोन लहान मुले आणि पतीसह माहेरी आलेली लेक पेरु तोडायला गच्चीवर गेल्यानंतर तेथील उच्च दाबाच्या वीजवाहिनीला लोखंडी रॉडचा स्पर्श झाल्याने जागीच गतप्राण झाली. वीजप्रवाह गच्चीवरील पाण्याच्या टाकीत उतरुन तीही फुटल्याने त्या पाण्याचा करंट (Electrick Shock) बसून आईचाही मृत्यू झाला. मोठ्या आवाजामुळे जावई दोन मुलांसह गच्चीवर धावत आला, परंतु करंट उतरलेल्या पाण्याने त्यांना जोराने बाजूला फेकल्याने ते या घटनेतून वाचले. मीना हनुमंत सोनवणे आणि आकांक्षा राहुल रणशूर या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला आहे. 


मूळचे निफाड (Niphad) तालुक्यातील गोंदेगाव येथील हनुमंत सोनवणे हे ओझरमधील दत्तनगरमधील वसाहतीत गणेश धामोरे यांच्याकडे पत्नी आणि मुलगा अभिषेकसह भाडेतत्वावर राहतात. रविवारी सुट्टी असल्याने आकांक्षा पती तसेच मुलगी आणि मुलगा यांना घेऊन माहेरी आली होती. दुपारच्या जेवणानंतर दीडच्या सुमारास सर्वांना पेरू खाण्याची इच्छा झाली. घराच्या बाजूलाच पेरुचे झाड असल्याने मायलेकी लोखंडी रॉड घेऊन गच्चीवर गेल्या. पेरुचे झाड जिथे होते, त्याच्या जवळूनच उच्च दाबाची वीज वाहिनी जात होती. परंतु आनंदाच्या भरात असलेल्या मायलेकीला त्याची आठवण राहिली नाही. पेरु तोडताना अचानक लोखंडी रॉड उच्च दाबाच्या वीज वाहिनीला लागल्याने मुलगी आकांक्षा गच्चीवरील पाण्याच्या फायबरच्या टाकीवर फेकली गेली आणि जागीच गत प्राण झाली. टाकी फुटून पाण्यातही करंट उतरल्याने काही कळायच्या आईचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आरडाओरडा सुरु झाल्याने जावईबापू दोन लहान मुलांना घेऊन जोराने गच्चीवर पळतच आले, वीज पाण्यातच उतरल्याने त्यांना त्या पाण्याने जोराने बाजूला फेकल्याने तिघांचा जीव वाचला.


तर भाऊही अपघातात जखमी.... 


राहुल रणशूर यांनी गच्चीवरुन आरडाओरड केल्याने कॉलनीतील लोकांनी धाव घेतली. पण गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह उतरला होता. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यातच आकांक्षाचा भावाला ही घटना समजल्यानंतर तातडीने घरी निघाला. दुचाकीहून घरी परतत असताना सिटी लिंकच्या बसला त्याने धडक दिल्याने डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ओझर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठवले असून सायंकाळी उशिरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


इतर संबंधित बातम्या : 


Delhi: पावसाच्या साचलेल्या पाण्यात विजेचा करंट उतरल्याने महिलेचा मृत्यू, दिल्ली स्टेशनवरची धक्कादायक घटना