Nashik Jagnnath Yatra : देशभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जगन्नाथ पुरी (Jagannath Puri) यात्रेला प्रारंभ झाला असून नाशिक (Nashik) शहरात देखील जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पंचवटी परिसरातुन जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रथयात्रा संपेपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले आहे.


नाशिक (Nashik) शहरात आज जगन्नाथ रथयात्रेला सुरवात झाली असून यंदा प्रथमच जगन्नाथ रथयात्रेच्या आयोजन पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास यांच्यासह रथयात्रा उत्सव समितीने केले आहे. दरम्यान आज सकाळी दहा वाजता जगन्नाथ रथयात्रेला शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरवात झाली आहे. रथयात्रा काट्या मारुती चौक, गणेशवाडी देवी चौक, मुंजोबा चौक, आयुर्वेदिक दवाखाना, गाडगे महाराज पुल, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक घुमाळ पॉईंट, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, शिवाजी चौक, काळाराम मंदिर पूर्व व उत्तर दरवाजासमोरून, ढिकले बंगला, नाग चौक, लक्ष्मण झूला पुल, काट्या मारुती चौक, पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत येणार आहे. रथयात्रा मार्गावरील वाहतूक मार्ग सकाळी 9 ते रथयात्रा संपेपर्यंत सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.  मात्र सदरचे निर्बंध पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्रिशमन दल व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू नाहीत, असे अधिसूचनेत म्हटले आहे.


या मार्गांवर नो एन्ट्री


दरम्यान शहरातील या मार्गावर वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी चौक - सीतागुफा रोडकडून येणारी वाहतूक बंद, मालेगाव स्टॅण्ड, रोकडोबा तालीम- बेरिकेटिंग पॉईंट, मालविय चौक काळाराम मंदिराकडे येणारी वाहतूक बंद, गणेशवाडी कॉर्नर देवी चौक खुट मंदिराजवळ बॅरिकटिंग पॉईंट, संतोष टी पॉईंट- निमाणी, काट्या मारुती पोलीस चौकीकडे जाणारी वाहतूक बंद, काट्या मारुती पोलीस चौकी काळाराम मंदिराकडे येणारी वाहतूक बंद, गणेशवाडी देवी मंदिर, नेहरु चौक, दहिपुल प्रकाश सुपारी, धुमाळ पॉईंट, मंगेश मिठाई, रविवारी कारजा या सर्व ठिकाणी बॅरिकेटिंग पॉईंट ठेवण्यात आले आहेत.


असे आहेत पर्यायी मार्ग


नाशिक पोलिसांकडून शहरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार पंचवटीतील काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडी मार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती संतोष टी पॉईंट - द्वारका शालिमार मार्गे इतरत्र जातील. दिंडोरी नाका ते होळकर पुलाकडे जाणारी वाहने मखमलाबाद नाका, रामवाडीपुला मार्गे इतरत्र जातील. संतोष टी पॉईंटकडून दिंडोरी नाक्याकडे जाणारी वाहने एकेरी मार्गाने जातील. बुधा हलवाई - बादशाही कॉर्नर मार्गे इतरत्र. बादशाही कॉर्नर - गाडगे महाराज पुतळा - शालिमार मार्गे इतरत्र जातील. सांगली बँक सिग्नल -नेहरू गार्डन - नेपाली कॉर्नर, शालिमार मार्गे इतरत्र जातील. रामवाडी पुलावरून अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सांगली बँक सिग्नल - शालिमार - गंगापूर रोड व सीबीएसमार्गे इतरत्र जातील.


शहर बसेससाठी सूचना


तसेच आज शहरातील सीटीलिंक बसेसचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. यात पंचवटी डेपो क्रमांक दोन येथून सिटी लिंक बसेस, तपोवन, निमाणी बसस्थानक आणि पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर बसेस या पंचवटी डेपोतून सुटतील. ओझर, दिंडोरी, पेठकडून शहरात येणाऱ्या बसेस व अन्य वाहने आडगाव नाका, कलमवार पुल, द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहरात येतील व जातील.