Nashik Lumpy Virus : लम्पी आजाराचा (Lumpy Virus) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व राज्यांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने बाधित असलेल्या जनावरांच्या साधारण 5 किलोमीटर भागातील जनावरांच्या लसीकरणावर (Vaccination) भर देण्यात यावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी दिल्या आहेत.
आज सिन्नर (Sinnar) तालुक्यातील पांगरी बु. येथे लम्पी आजाराने बाधित जनावरांची पाहणी करतेवेळी डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहायक आयुक्त डॉ. बाबुराव नरवाडे, जिल्हा परिषदचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, सिन्नर प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश दुबे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश पवार, डॉ. विकास चकतर, डॉ. उर्मिला जगताप डॉक्टर सचिन वर्ते डॉ. निवृत्ती आहेर डॉ. अरविंद पवार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारती पवार म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लम्पी आजाराबाबत सतर्कता बाळगण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले असून त्याबाबत आवश्यक ती सर्व मदतही उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमार्फत लम्पी आजाराबाबत खबरदारी घेण्यात आली असून त्याअंतर्गत गोवंश जनावरांचे लसीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी प्रमाणात असून आतापर्यंत साधारण 24 गोवंश जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली होती. त्यातील 18 जनावरे बरी झाली आहेत, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
लम्पी आजाराबाबत गैरसमज पसरविल्यास तसेच लसीकरणासाठी अवास्तव पैशांची मागणी केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोरोना काळात प्रतिबंधित क्षेत्रात ज्याप्रमाणे दक्षता घेण्यात आली त्याच धर्तीवर लम्पी आजाराबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत असतांना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संकटाच्या काळात योग्यती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लम्पी रोग तात्काळ नियंत्रणात यावा, या करीता सध्या जिल्हा परिषद सेस फंडातून तातडीने 1 लाख 05 हजार 300 गोट पॉक्स लस मात्रा उपलब्ध करण्यात आलेली आहे. बाधित गावापासून 5 कि.मी. च्या परिसरात येणान्या गावातील तीन महिने वयोगटावरील वरील सर्व गोवर्गिय जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्या मार्फत आहे. लसीकरण करून घ्यावे व रोग नियंत्रणात पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गजे यांनी केले आहे.