Nashik Saptshrungi Gad : चैत्रोत्सवानिमित्त (Chaitra Utsav) सप्तश्रृंग गडावर (saptshrungi Gad) दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करत असून त्यामुळे प्रसादाची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर होणारी संभाव्य भेसळ टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून धडक मोहीम राबवून अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले जात आहेत. तसेच अधिकाऱ्यांचे पथक आठ दिवस गडावर तळ ठोकून आहेत.


गुरुवारपासून सप्तशृंगी गडावर (Saptshurngi Devi) चैत्रोत्सवानिमित्त यात्रोत्सव सुरू आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करत आहेत. राज्यभरातून भाविक दाखल होत असून सप्तशृंगी देवी ट्रस्ट (Saptshrungi Devi trust) आणि स्थानिक प्रशासनाकडून दर्शनासह इतर सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. अशातच भाविकांची गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी निवारा व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर गडावर आलेला प्रत्येक भाविक येथून प्रसाद खरेदी करत असतो. भाविकांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार प्रसाद व अन्नपदार्थ मिळावेत, याकरता अन्न व औषध प्रशासनाची (FDA) पथके तपासणी मोहीम राबवत आहेत.


दरम्यान सप्तशृंगी गडावर वर्षभर भाविकांचा राबता असतो. त्यामुळे दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक कुटुंबियांसाठी प्रसाद घरी नेत असतो. मात्र अनेकदा विक्रेत्यांकडून प्रसादात भेसळ करण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन कडक मोहीम राबवत चैत्रोत्सव संपेपर्यंत पथक तपासणी करणार आहे. या पथकाने प्रसाद विक्री दुकानांवर तपासणी करत मलई, मावा व अन्य पदार्थ्याचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेत प्रयोगशाळेत पाठविले आहेत. अन्न य औषध प्रशासन सहआयुक्त गणेश परळीकर, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, संदीप देवरे यांचे पथक आठ दिवस गडावर तळ ठोकून आहे.


प्रसादात भेसळ करू नका, अन्यथा.... 


सप्तशृंगी गडावर लाखोंच्या संख्यने भाविक दर्शनसाठी येत आहेत. त्यामुळे गडावर ठिकठिकाणी हॉटेल्स, स्टॉल, प्रसाद विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याकडे विशेष लक्ष दिले आहे. सप्तश्रृंगी गडावरील हॉटेल, स्टॉल, प्रसाद विक्रेत्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना स्वच्छता परवाना नोंदणी याविषयी सूचना दिल्या आहेत. तसेच विषबाधेसारख्या घटना होऊ नयेत, यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले आहे. तरीही अनुचित घटना घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती विभागाने दिली.


खासगी वाहनांना प्रवेश नाही...


दरम्यान उद्यापासून सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव सुरु होत असून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी 30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये भाविकांसह प्रवासी वाहतूक सुरू राहील. पायी दर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.