Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील गंगापूर रोड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदण्यात आलेला खड्डा लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नाशिकमधील गंगापूर शिवारातील (Gangapur Shiwar) ध्रुवनगर भागात एका नवीन इमारतीच्या बांधकाम साईटवर लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका दहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अपूर्व बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अपूर्व राजेंद्र तोडुलकर यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर शिवारात ध्रुवनगर टॉवर येथील नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात गुरुवारी सुभाष सोपान भागवत यांचा मुलगा यश भागवत पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच खड्ड्यात पाणी असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेत मृत यशचे वडील सुभाष सोपान भागवत यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अपूर्व राजेंद्र तोंडुलकर यांच्याविरोधात यशच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


बांधकाम व्यवसायिकाविरोधात गुन्हा


गंगापूर परिसरात सदर बांधकाम सुरू असून पोलिसांच्या प्राथमिक तपासात बांधकाम प्रकल्पाला कोणतेही कुंपण नसल्याचे आढळून आले आहे. बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केल्यामुळे यश सुभाष भागवत याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.


सात वर्षीय मुलाचा मृत्यू...


दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी गावातील वाहत्या पाटात पडून एका सात वर्षीय मुलाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे राहणारा शिवरुद्र भूषण घोलप हा घरासमोर खेळत असताना पळता पळता त्याचा पाय घसरून तो घरासमोरील वाहत्या पाण्याच्या पाटामध्ये पडला होता. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला..


मुलांची काळजी घेणं महत्वाचं... 


लहान मुलांकडे थोडे दुर्लक्ष झाल्यास अनुचित घटना होण्याचा धोका असतो. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे खेळत्या वयात मुलांना धोका, सुरक्षा या गोष्टी समजून येत नाहीत. मात्र यासाठी पालकांनी सजग असणे महत्वाचे आहे. अनेकदा पालक कामात व्यस्त असता मुलं चालत चालत किंवा खेळत खेळत घराबाहेर पडत असते. अशावेळी रस्त्यावर जाण, कुठेतरी पडणं अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे.