Nashik News : नाशिक (Nashik) शहरात काही दिवसांपासून अनधिकृत होर्डिंगचा (Illegel Banner) पसारा वाढला असून त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने (Nashik NMC) धडक कारवाई सुरु केली असून आतापर्यंत 60 अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या शहरांतील महत्वाच्या ठिकाणी अद्यापही अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले आहेत. वाहतूक बेट, रस्त्याचे वळण आदी ठिकाणी हि बॅनरबाजी केल्याचे दिसून येते. यामुळे सरळ वाहतुकीवर परिणाम होत असून यावर कारवाईचा बडगा महापालिकेककडून उगारण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी माेठ्या संख्येने अनधिकृत होर्डींग्ज लावले होते. नाशिक शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या अवैध होर्डींग्जने पोलिस व मनपा यंत्रणेकडून कारवाई होणे आवश्यक असल्याचे दिसते.
दरम्यान नाशिक (Nashik) शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी अनधिकृत होर्डिंग लावण्यास बंदी असतानाही होर्डिंग लावण्यावर महापालिकाकडून कारवाई केली जात आहे. मनपाच्या विभागीय कार्यालयाकडून शहरातील 60 अनधिकृत होर्डिंग व जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत. यात नाशिक पूर्व विभागाने सर्वाधिक 35 कारवाया केले आहेत. शहरातील चौकांचे सुशोभीकरण करून शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार अनेक चौक आणि वाहतूक बेटे सुशोभीकरण करण्यासाठी विविध आस्थापनांना दिली जात आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला अनधिकृत फलक आणि होर्डिंग मुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. त्यामुळे महापालिकेने अशा अनधिकृत होर्डिंग वर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
अशी झाली कारवाई
नाशिक महापालिकेने केलेल्या कारवाईत नाशिक पूर्व विभागाने विशेष करावी केली आहे. नाशिक पूर्व विभागाने सर्वाधिक 35 कारवाई केल्या. त्यानंतर पश्चिम विभागाकडून आठ, पंचवटी विभागाकडून 10, सातपूर विभागीय कार्यालयानुसार कारवाई केले आहेत. तर नाशिक रोड आणि सिडको विभागीय कार्यालयाकडून एकही कारवाई करण्यात आली नसल्याने अनधिकृत होर्डिंग नाहीत का असा प्रश्न विचारला जात आहे.
महापालिकेचे होर्डिंग अनधिकृत?
दरम्यान काही दिवसांपूर्वी महापालिकेने स्वतः शहरातील विविध चौकात, सिग्नलवर जाहिराती साठी होर्डिंग लावले आहेत. त्या आधारे अनेक जाहिरातदारांकडून जाहिराती स्वीकारल्या जात आहेत. त्यातून महापालिका प्रशासनाला महसूल मिळतो आहे. मात्र हे होर्डिंग्स देखील वाहतुकीसाठी अडथळे ठरत असल्याचे समोर आले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक बेटातील झाडांच्या फांद्या तोंडून हे होर्डिंग उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील खाजगी संस्थांकडून लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवर कारवाई होत असताना अशा पद्धतीने महापालिकेने लावलेले होर्डिंग्स अनधिकृत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.