Nashik Rain : नाशिक (Nashik) शहरात पावसाच्या हलक्या व मध्यम सरींनी (Light Rain) तळ ठोकला असून इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वरसह (Trimbakeshwer) अन्य काही तालुक्यांत पावसाने संततधार सुरूच असल्याने गंगापूर धरणातून (Gangapur Dam) बुधवारी पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला असून, दारणासह अन्य धरणांमधूनही टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येतो आहे. गोदावरीची (Godawari River) पाण्याची पातळी वाढली असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


नाशिकसह जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असून आज नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर केला आहे. तर सकाळी दहा वाजेपर्यत नाशिककरांना सूर्यदर्शन झाले होते, त्यामुळे पाऊस येण्याची चिन्हे कमी असताना दुपारनंतर हलक्या सरींची बरसात सुरु झाली आहे. तर पालखेड आणि गंगापूर धरण समूहाचे पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या मध्यम आणि जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीदेखील वाढते आहे. 


दरम्यान शहरात मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत 17.8 मिमी पावसाची नोंद झाली असून गंगापूर पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळी नियंत्रित येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कालपासून विसर्ग करण्यात येत आहे. काल दुपारी तीन वाजता १००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कायम असल्याने बुधवारी सकाळी सहापासून 3 हजार 618 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. तर इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे दारणा धरणातून काही तासांत दुपटीने विसर्ग वाढविण्यात आला. 


गोदापात्रात पाणी पातळीत वाढ
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतो आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी तीनपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी हा विसर्ग आणखी वाढविण्यात आला. गंगापूर धरणातील विसर्ग आणि शहरात सुरू असलेली संततधार यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे गोदाघाटावर काही वाहने पाण्यात अडकली. ही वाहने सुरक्षित काढण्यासाठी यंत्रणांना प्रयत्न करावे लागले. बुधवारी सकाळी हा विसर्ग दुपटीने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


धरणांमधून सुरू असलेला विसर्ग 
दरम्यान नाशिकसह जिल्ह्यात पावसाची दोन दिवसांपासून संततधार सुरूच होती. त्यामुळे अनेक धरणांतुन विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास दारणातून 14474, कडवा 2250, आळंदी 80, पालखेड 8100, वालदेवी 183, भोजापूर 399, मुकणे 2500, नांदूरमध्यमेश्वर 39172 तर होळकर पुलाखालून 5717 क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज दुपारी बारा वाजेपासून 3618 क्युसेक ने विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. मात्र आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे विसर्ग घटण्याची शक्यता आहे.