Aaditya Thakaray In Nashik : शिवसंवाद यात्रेत (Shivsamvad Yatra) उपस्थित शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंनी (Aditya Thakaray) हे राजकारण तुम्हाला पटणार आहे का? असा सवाल केला. यावर मनमाडच्या (Manmad) शिवसैनिकांनी नाही शब्दात जोरदार घोषणाबाजी केली. याचबरोबर चांगला मुख्यमंत्री असताना बंडखोरांनी असं का केलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. तर गद्दारांना प्रश्न विचारायचे नसतात, असे म्हणत सुहास कांदेवर (Suhas Kande) टीकास्त्र सोडले.


आदित्य ठाकरे हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून त्यांनी बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेचे आयोजन केले होते. या निमित्ताने त्यांनी मनमाड मध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील नंतरच्या काळात राजीनामे दिले यामुळे शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे शिवसंमाच्या माध्यमातून राज्यभरात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी बंडखोर आमदारांचा पुन्हा एकदा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. 


शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरेंना केले. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य  ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्याचे नाव न घेता टीका केली आहे.


आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले कि, मी मंत्री असताना अनेक वचनं पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही करत आहोत. पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही समजलेलं नाही. याआधी मी मनमाडमध्ये आलो होतो. आपले सरकार आले तर पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करेन, असे मी आश्वासन दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर करुन दिले. पण स्वत:साठी काहीही आरोप केले जात आहेत. या टीकांना मी उत्तरं देत बसणार नाही. गद्दार नसते तर उत्तरं दिली असती. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी कांदे यांचे नाव न घेता केली.


पुढे ते म्हणाले कि एखाद्या शिवसैनिकाने प्रश्न विचारला असता तर त्या प्रश्नाचे उत्तर मी दिले असते. पण गद्दांराना मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी गद्दारी का केली, याचं उत्तर अगोदर द्यावं. पर्यटन खात्याला कधीही निधी मिळत नव्हता. मात्र आमच्या सरकारने पर्यटन खात्याला 1700 कोटी रुपये दिले. मनमाडमध्ये मी आठ कोटी रुपयांचा फंड दिला आहे, अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली.


सुहास कांदे काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरे आतापर्यंत एकदाच मनमाडला आले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही, हे मी छातीठोकपणे सांगतो. आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प मी दिला आहे आणि त्यासाठी पैसे दिल्याचं सांगून दाखवावं. मनमाड शहरात किंवा नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा,” असं असे आव्हान सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना दिले होते. त्यांनतर आदित्य ठाकरे यांनी मनमाडच्या सभेत सुहास कांदे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.