Maharashtra Politics Shivsena : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसंवाद दौरा सुरू केल्यानंतर आता बंडखोर आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. आम्ही गद्दारी केली नाही. पक्षातून फुटलो नाही तर नेत्या विरोधात उठाव केला आहे. तुमचे नेतृत्व आम्हला मान्य नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत जाण्यासाठी युती केली नव्हती. आम्ही उठाव केला. त्यात, पहिला क्रमांक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा होता तर चौथा क्रमांक माझा होता असेही कांदे यांनी म्हटले. 


शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मनमाडमध्ये शिवसंवाद कार्यक्रमासाठी आले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यात जाऊन चर्चा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शेकडो समर्थकांसह मनमाडमध्ये दाखल होणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटकाव केला. बंडखोर आमदार सुहास कांदे आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात म्हटले की, मी कोणाला उत्तर देण्यासाठी बोलत नाही. 'मातोश्री' बद्दल आजही आदर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अपशब्द बोलणार नाही याची आम्ही शपथ घेतली असल्याचे कांदे यांनी सांगितले. आमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला. मात्र, त्यांच्याबाबत बोलण्यास गेलो तेव्हा मात्र उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतले नसल्याचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये एकमत नव्हते असेही त्यांनी सांगितले. 


आदित्य वाघ आहेत पण...


सुहास कांदे म्हणाले की, आदित्य ठाकरे हे वाघ आहेत. मात्र त्यांनी भूमिका बदलली. मटणाच्या ऐवजी डाळ भात खायला लागले असल्याचे उपरोधिक वक्तव्य त्यांनी केले. शिवसेना आता संपत चालली आहे. पक्षातून आमदार गेले. फक्त चार पाच बडवे उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.