Nashik Mumbai Highway : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गवरील (Nashik Mumbai Highway) खड्ड्यांच्या समस्यांचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nashik Youth Congress) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींना (Minister Nitin Gadkari) पाठविले आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत रस्ते दुरुस्त न केल्यास वाहनांवरील फास्टटॅगला (Fasttag) काळे स्टिकर लावण्याचा इशारा देखील पत्राद्वारे करण्यात आला आहे. 
 
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गवर खड्ड्यांचे साम्राज्य (Potholes) पसरले असून वाहनधारकांना कसरत करून रस्त्याचे अंतर पार करावे लागत आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे घोटी, इगतपुरी व कसारा घाटात (Kasara Ghat) अनेक अपघात या खड्ड्यांमुळे घडतात. कसारा घाटात अपघात झाल्यास 2 दिवस वाहनाच्या लांब रांगा लागत असून 12-12 तास वाहतूक खोळंबा पहावयास मिळत आहे. 


मुंबई-नाशिक महामार्गावर एकूण 03 टोल नाके असून देखील या महामार्गाची दयनिय अवस्था पहावयास मिळते. दरवर्षी NHAI ला आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. परंतु रस्त्याच्या कामाचा दर्जा खालावलेला असल्याने पुढील वर्षी पुन्हा रस्त्याचे वाटोळे झालेले असते. दिनांक 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्ग 03 (मुंबई-नाशिक) वरील खड्डे तातडीने बुजवून दर्जेदार रस्ता करावा, अन्यथा वाहनांवरील फास्टटॅक वर काळे स्टिकर लावण्यात येईल असे पत्रात म्हटले आहे.


मुंबई नाशिक महामार्ग खड्डे न्यायालयात 
दरम्यान मुंबई नाशिक महामार्ग हा दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिक, नाशिक ते मुंबई हा मार्ग सुकर झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते आहे. शिवाय महामार्गावर पडलेल्या  खड्ड्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे मागील वर्षी हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट होते. खड्ड्यांमुळे लोकांना जीव गमावावा लागत असून राज्य सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याचे सुनावले होते. तसेच तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेशही दिले होते. शिवाय मुंबई नाशिक महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने केंद्र सरकारने त्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचेही स्पष्ट केले होते.