Nashik Rogar Hami Yojna : मजुरांच्या हाताला काम देणाऱ्या रोजगार हमी योजने अंर्तगत जिल्ह्यात तब्बल २२ हजार मजूर कार्यरत आहेत. या रोहयोच्या कामांत शेतीच्या कामांचा समावेश करण्यात यावा, जेणेकरून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना अधिक कामे उपलब्ध होतील, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 


जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. जिल्ह्याच्या एकूण निधीपैकी साधारण 60 ते 65 टक्के निधी जिल्हा परिषदेच्या कामांसाठी देण्यात येत असतो. ग्रामीण भागातील सर्वच कामे ही जिल्हा परिषद यंत्रणेच्या माध्यमातून होत असतात. त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी खर्च करण्यात यावा. कोणत्याही कारणास्तव निधी अखर्चित स्वरूपात शासनास परत जाणार नाही याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घेण्याची सुचना त्यांनी यावेळी केली. 


घरकुल योजनेची ८६ टक्के कामे पूर्ण 
जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल कुटुंबाना घरकुल योजनेचा लाभ होत असून घरकुल आवास योजनेंतर्गत 86 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तसेच उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येऊन पुढील आठ महिन्यात हि कामे पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. जलजीवन मिशन यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा असतो. याकरीता अनुभवी संस्था नेमण्यात येणार असून जलजीवन मिशनच्या कामांमध्ये जिल्ह्याचा पहिला क्रमांक येण्यासाठी जिल्हा परिषद सर्वोतपरी आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजने अंतर्गत आज साधारण 22 हजार मजुर कार्यरत असून या योजनेत शेती विषयक कामांचा देखील समावेश करण्यात यावा. ज्यामुळे रोजगार हमी योजनेच्या मजुरांना अधिक कामे उपलब्ध होतील. तसेच सांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन देखील शास्त्रीय पद्धतीने करण्यात येत आहे. 


खते व बियाणांचा साठा
कृषी विभागामार्फत पुरेशा प्रमाणात खते व बियाणांचा साठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार खते व बियाणे  पुरविण्यात यावीत. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात योग्य प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध करण्यात यावा. त्याचप्रमाणे शाळा व अंगणवाडी बांधकाम, स्वच्छता व पाणी पुरवठा यासारख्या कामांत कोणतीही तडजोड करण्यात येवू नये,  अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.