Nashik BJP : ओबीसी राजकीय आरक्षण (OB Reservation) लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल भाजप कार्यालय नाशिक (Nashik) येथे भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. 


सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने बांठिया अहवाल (Banthiya Report) मान्य केला असून राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे आता ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याचाच जल्लोष आता पुणे, नाशिक, पंढरपूर, उस्मानाबादसह संपूर्ण राज्यभरात साजरा केला जात आहे. ओबीसी बांधव एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत आहेत.


दरम्यान याच पार्श्वभूमीवर नाशिक भाजपच्या वतीने आज शहर कार्यालयात ओबीसी आरक्षण मिळाल्याचा जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palave) म्हणाले कि, ओबीसी राजकीय आरक्षण लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारने वेळकाढू पण केला. मात्र आताच्या सरकराने पंधरा दिवसात आरक्षणाचा मोकळा करून दिल्याने ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या दरम्यानचा काळात अनेक पक्षांनी यासाठी जोरदार निदर्शने केली जात होती. त्याचे श्रेय देखील पक्ष घेत आहेत. त्यात भाजपदेखील असून पक्षाच्या वतीने अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात आली होती. मात्र आता ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे राज्यभरात ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पेढे वाटून, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला आहे. 


नाशिक भाजपच्या वतीने भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे भाजपचे शहर पदाधिकारी यावेळी उत्साहात होते. यावेळी ढोल ताशा वाजवून पेढे वाटून ओबीसी आरक्षणाचा आनंद साजरा करण्यात आला. त्याचबरोबर अनेकांनी ढोल ताशांच्या गाजरावर ताल धरत आनंद व्यक्त केला आहे.


15 दिवसांत ओबीसी समाजाला न्याय मिळाला : गिरीश पालवे 
खऱ्या अर्थाने एवढी आंदोलने करण्याची वेळ यायला नको होती. मध्यप्रदेश सरकारला देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने चार दिवसात आरक्षण मिळाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला पंधरा दिवसात आरक्षण मिळाले आहे. अन राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते हे आरक्षण आमच्यामुळे मिळाले. मात्र हे साफ चुकीचं असून त्यांना फक्त नाटक करायचं होत. त्यामुळे इतका वेळ जात होता आणि आंदोलने करावी लागत होती. आज अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या 100 टक्के मार्गदर्शनामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले असल्याची प्रतिक्रिया गिरीश पालवे यांनी व्यक्त केली.