Nashik Rain : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील शेंद्रीपाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे (Aaditya Thakaray) यांनी भेट दिलेल्या शेंद्रीपाड्यातील लोखंडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ये जा करण्यासाठी आता हा मार्ग बंद करण्यात आला आहे. 


नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरु असून मंगळवार पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर आता पर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आलेला शेंद्री पाडा येथील लोखंडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची येजा पूर्ण पणे थांबली आहे. 


मे महिन्यात त्र्यंबक (Trimbakeshwer) तालुक्यातील शेंद्रीपाडा येथील महिलांचा लाकडी बल्ल्यावरील जीवघेणा प्रवास माध्यमांनी उजेडात आणला होता. त्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत संबंधित पुलावर लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही दिवसांतच या ठिकाणी लोखंडी पूल उभारण्यात आला होता. शिवाय या लोखंडी पुलाच्या उदघाटनासाठी स्वतः आदित्य ठाकरे आले होते. 


दरम्यान गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेला पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आदित्य ठाकरे यांच्यां माध्यमातून बसविण्यात आलेला तास नदीवरील लोखंडी पुल पाण्याखाली गेला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा शेंद्रीपाडा परिसरातील महिलांचा पाण्यासाठीचा  जीवघेणा संघर्ष एबीपी माझाने महाराष्ट्रला दाखविला. त्यांनतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनाच्या माध्यमातून तास नदी काठावर लोखंडी पूल बसविला. 30 फुटाहून अधिक उंचीवर पूल बसविण्यात आला होता. पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाईल, पुलाचा उपयोग होणार नाही अशी माहिती स्थानिकांनी त्याचवेळी प्रशासनाला आणि युवासेना पदाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आता पहिल्याच पावसात लोखंडी पूल पाण्याखाली गेला आहे. 


पाण्यासाठी महिलांचा संघर्ष 
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सगळीकडे नदी, नाले, विहिरी तुडुंब भरले आहेत. पावसाने (Rain) बळीराजा देखील सुखावला आहे. मात्र एवढा पाऊस पडूनही महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष आजही जैसे थे आहे. नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील शेंद्री पाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील महिला भर पुरात पाण्याचा हंडा डोक्यावर घेत वाट काढत आहेत.