Nashik Dam Storage : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात वरुणराजाच्या कृपावर्षावामुळे जिल्ह्यातील धरणे भरण्यास मदत होत असून, गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये धरणांमधील एकूण पाणीसाठ्यामध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पाच धरणे ओव्हरफ्लो झाली इतर धरणे भरण्याच्याच मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागाची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली असून, आजमितीस धरणांमध्ये ७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
नाशिक शहरात पावसाचा जोर कमी झाला असून जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) पट्ट्यात पावसाची सत्ताधार सुरूच आहे. यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नांदुरमाध्यमेश्वर, पालखेड डॅमसह इतर काही धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील महत्वाची धरणे तुडुंब भरली आहेत. दोन तीनदिवसात झालेल्या पावसामुळे अनेक धरणे पन्नास टक्क्यांच्या वर गेली आहेत. आजच्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या धरण साठ्यानुसार दारणा, भावली, गंगापूर, पालखेड, कडवा, करंजवण, ओझरखेड, वाघाड, पुणेगाव आदी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये एकूण ७३ टक्के पाणीसाठा उपलबध झाला आहे. आतापर्यंत आळंदी, वाघाड, ओझरखेड, हरणबारी, केळझर हि धरणे १०० टक्के भरली आहेत. गेल्या पावसाळ्यात गंगापूर, आळंदी, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदुरमध्यमेश्वर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज यासंह बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. यावर्षीही हीच परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याच सर्वच भागात झालेल्या पावसामुळे हा धरणसाठा ७३ टक्क्यांवर पोहोचला असल्याची अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
असा आहे धरणसाठा
दरम्यान जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गंगापूर धरण 63 टक्के, गौतमी गोदावरी धरण 72 टक्के, कश्यपी धरण 61 टक्के, आळंदी 100 टक्के, पालखेड 49, करंजवण 81, वाघाड 100, ओझरखेड 100, पुणेगाव 78, दारणा 66, भावली 91, मुकणे 66, नांदुरमाध्यमेश्वर 00, तर गंगापूरमधून 8880 क्युसेक, दारणातून 10670, आळंदी 687, कडवा 2592, नांदूरमध्यमेश्वर 58697 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. तर होळकर पुलाखालून 10854 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. दोन -तीन दिवस जिल्ह्याच्या अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे.