Nashik Congress : 'राहुल गांधी (Rahul Gandhi) संघर्ष करो है, तुम्हारे साथ है', 'नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी चलेगी', मोदी हमसे डरता है, ईडीको आज करता है', अशी जोरदार घोषणाबाजी करत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर (Nashik Collector Office) नाशिक काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. 


‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची चौकशी केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या नाशिकच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Nashik Congress) जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांच्या ईडी (ED) चौकशी विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.


दरम्यान आंदोलनावेळी केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय तर  राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे येणाऱ्या काळात त्यांना जनता निश्चित उत्तर देईल अशा प्रकारची प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष शरद आहेर यांनी दिली.


सूडबुद्धीच राजकारण
नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आले.  राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जी कारवाई करण्यात येत आहे, ही दादागिरी असल्याची भावना माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधींवर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटून उठलेले आहेत. भाजपने सूडबुद्धीने हे काम सुरू केले आहे. तर कश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रेमुळे भाजपचे धाबे दणाणले असून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीचा पराभव दिसत आहे. म्हणून ही सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी दिली. एकूणच आता नाशिक सह राज्यभरातील काँग्रेसच्या केंद्र सरकार निषेधार्थ आंदोलनानंतर राजकारण काय वळण घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


नेमकं प्रकरण काय? 
‘ईडी’ने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची तीन दिवस चौकशी करण्यात आली. याविरोधात नाशिकचे काँग्रेस कायकर्ते रस्त्यावर उतरले. केंद्रातील मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन केले.