Nashik CNG Rate : नाशिककरांसाठी (Nashik) मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळं नाशिककरांना एक किलो सीएनजीसाठी 86 रुपये मोजावे लागणार आहेत. 


एकीकडे महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून दुसरीकडे सातत्याने जीवनावश्यक वस्तूच्या दरात वाढ होत आहे. किराणा, खाद्यतेल, भाजीपाला आदींच्या किमती गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत असताना यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. नाशिकमध्ये नैसर्गिक वायू अर्थात सीएनजीच्या दरात (CNG rates) तीन रुपयांची वाढ झाली आहे. शनिवारी (दि.21) सकाळी सहा वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतींबरोबर आता सीएनजी वाहन धारकांनाही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. 


एकीकडे अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सीएनजीवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल महागल्याने अनेकांनी वाहने सीएनजी करण्यावर भर दिला. मात्र आता सीएनजी च्या दरातच वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी पुन्हा एकदा लालपरीकडे नागरिकांची पाऊले वळू लागली आहेत. 


अशी झाली वाढ 
नाशिकमध्ये गेल्या दीड महिन्यात सीएनजीचे दर प्रतिकिलो 15 रुपयांनी वाढले असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशकात सीएनजीचे दर प्रतिकिलो 71 रुपये ऐवढे होते. आणि आता हेच दर 86 रुपयांवर पोहचल्यानं नाशिककरांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. याआधी सीएनजीचा दर हा 83 रुपये होता. मात्र पुन्हा एकदा भाववाढ झाल्याने नाशिकरांच्या खिशाला झळ बसणार असून वाढत्या महागाईने नाशिककर हैराण झाले आहेत. 


घरगुती गॅसही परवडेना! 


दरम्यान सर्वसामान्याना लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तुमधील गॅसही महागला असून गृहिणींचे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वीच घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसचे (LPG Gas Price Hike) दर वाढवण्यात आले होते. 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले होते. 50 रुपयांची दरवाढ झाल्यानं आता सिलेंडरची किंमत 1003 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा महिला गॅसकडून चुलीकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.