Nashik News : आपल्या विविध कलागुणांनी सर्वपरिचित असणारी नाशिकची (Nashik) आदिश्री पगार (Adishree Pagar) हिने पुन्हा लक्षवेधक कामगिरी केली आहे. आता आदिश्रीने अवघ्या दहाव्या वर्षीच पुस्तक लिहले असून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. एवढ्या कमी वयात पुस्तक प्रकाशित (Book Published) केल्याने तिच्यावर सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मूळची बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) उत्राणे येथील रहिवाशी असलेली आदिश्री नाशिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील सहावीत शिकते. लहानपणापासून आदिश्रीने वेगवगळ्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयत्न केला आहे. आदिश्रीने चौथीत असताना एका वेबसाईटची निर्मिती केली. या वेबसाईटच्या माध्यमातून तिने पाणीबचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आदिश्रीने उन्हाळ्याच्या शालेय सुट्यांत आमीर खान व किरण राव प्रस्तुत ‘तुफान आलंया’ या पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमाने प्रेरित होऊन संकेतस्थळाची निर्मिती केली. या संकेतस्थळातून पाणी वाचविणे व पाण्याचे महत्त्व याविषयीचा संदेश आदिश्रीने छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यानंतर आदिश्रीने वयाच्या पाचव्या वर्षापासून संकेतस्थळ बनविण्यासाठी लागणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा (Programming Language) अभ्यास तिने सुरू केला होता. संकेतस्थळ तयार केल्यानंतर आदिश्रीने आता कमालच केली आहे. वेबसाईटसाठी लागणाऱ्या प्रोग्रामिंग भाषेची एक पुस्तक तिने तयार केली असून, Learn Bootstrap Web Design असे ह्या पुस्तिकेचे नाव आहे. हि पुस्तिका प्रकाशित झाली असून आता अमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. पाणी बचतीसाठी, झाडांचे संवर्धन, शैक्षणिक अँप तसेच वाहतुक नियमांची माहिती देणारे विविध अँप ची निर्मिती केली आहे.
पाण्याचे महत्व व बचतीसाठी तिने पहिली वेबसाईट तयार केली असून, कोरोनाच्या कठीण काळात आरोग्याच्या जनजागृतीसाठी दुसऱ्या वेबसाईटची निर्मिती केली आहे. स्वप्नातील गाव ह्या वेबसाईटच्या माध्यमातून एका आदर्श गावाची संकल्पना व त्यात कुठल्या सोयी सुविधा असाव्यात याविषयी माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न आदिश्रीने केला आहे. संगणक क्षेत्रात लिखाण करणाऱ्या जागतिक पातळीवरील लहान वर्गातील मुलांपैकी एक म्हणून आदिश्रीला ओळखले जाते.
कमी वयात असंख्य पदके
शैक्षणिक अभ्यासक्रमात आदिश्रीने आतापर्यंत International Olympiad Exam मध्ये १७ सुवर्णपदक व २ रजत पदक मिळविले आहेत. त्यात ३ विशेष प्राविण्य पदकासह गणितात मिळविलेल्या एका आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचा समावेश आहे. तसेच मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी या विषयात विशेष स्कॉलरशिपवर आदिश्रीने आपले नाव कोरले आहे. भारतातून निवड झालेल्या १४० विद्यार्थ्यापैकी आदिश्री हि एक आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा विशेष बालगौरव पुरस्कार व हिर्वांकुर फाऊनडेशनचा पर्यावरण क्षेत्रातील कामासाठी हिर्वांकुर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
झाडांना केले बोलके
झाडांच्या संवर्धनासाठी व जनजागृतीसाठी तिने QR code प्रणाली विकसित केली असून १५० हून अधिक विविध प्रजातीच्या झाडांचे QR code चा यात समावेश आहे. पुस्तिकेच्या माध्यमातून मिळनाऱ्या निधीचा काही भाग ती झाडांचे संवर्धन व झाडांसाठीच्या QR code प्रोजेक्टवर उपयोगी आणण्याचा तिचा मानस आहे. आदिश्रीला अभ्यासाबरोबरच चित्रकला, स्केटिंग, पियानो वाजविणे, कत्थक, भरतनाट्यम, सायकलिंगची विशेष आवड आहे.