Nashik Crime : नाशिक शहरात दिवसाढवळ्या गुन्हे होत असून कुणालाही कायद्याचा धाक राहिला नसल्याचे सद्यस्थितीवरून दिसते आहे. शहरातील औरंगाबाद नाका येथील क्रिकेट खेळणाऱ्या एका युवकांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना  घडली आहे. या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 


नाशिक शहराच्या गुन्हेगारी संदर्भात पोलिसही हैरा हैराण झाले आहेत. एका मागोमाग एक खून, चाकू हल्ला आदी घटना सर्रासपणे उघडकीस येत आहेत. मात्र पोलीस हातावर हात धरून उभे आहेत कि काय असचं या घटनांवरून दिसून येते. शहरातील औरंगाबाद नाका येथील विजय कॉलनीतील देवी मंदिराजवळ एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. दीपक डावरे असे या तरुणाचे नाव आहे. 


विजय कॉलनी येथील मैदानावर काही मुले खेळत होती. यामध्ये दिपकही क्रिकेट खेळत होता. अशातच सदाशिव झाबरे त्याच्या मित्रांसमवेत मैदानात आला. त्यांनी  दीपक याच्यावर चाकू हल्ला केला. हल्ला एवढा भयंकर होता कि, दिपकचा कोथळाच बाहेर पडला. या अवस्थेत हल्लेखोर सोडून पळाले. तर हल्ल्या वेळी इतर खेळणारे तरुणांनी देखील घटना पाहून पळ काढला. सध्या दिपकची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 


दरम्यान नाशिककरांना खुनाची घटना काही नवीन नाही. मात्र दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. घटना घडताच काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसाना घटनेची माहिती दिली. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र शहरात सातत्याने होणाऱ्या अशा घटनांनी सामाजिक स्वास्थ बिघडत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


नाशिकला झालंय काय?
नाशिकला झालंय काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. एकीकडे स्मार्ट शहर म्हणून ओळख असताना अलीकडच्या खुनाच्या घटना पाहता 'खुनी शहर' होतंय कि काय? असाही सवाल उपस्थित झाला आहे. गुन्हेगारी थोपवण्यासाठी नाशिक पोलीस या ना त्या मार्गाने गुन्ह्यांचा छडा लावत असताना एक गुन्हा मिटत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने नाशिक पोलीस देखील हैराण झाले आहेत.