Nashik News : पावसाळा तोडांवर आल्याने नाशिकमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाला आला आहे. पावसाळ्यात दुर्घटना घडू नये, यासाठी नाशिक, मालेगाव महापालिकेने धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने नाशिक व मालेगाव महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
नाशिकमध्ये असंख्य प्राचीन वाडे, धोकादायक इमारती नजरेस पडतात. दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी किंवा पावसाळ्यात या इमारती कोसळतात. त्यामुळे अँकेड जीवितहानी होते. दरम्यान दरवर्षीं प्रशासनाकडून धोकादायक इमारतींची यादी करण्यात येते. त्यांना नोटीस बजावण्यात येतात. मात्र एवढे करूनही नागरिक अनेकदा स्थलातंर करत नाहीत. परिणामी काही वेळा मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागते. तसेच पावसाळ्यात अनेकदा गोदावरीला पूर येऊन पाणी नदीकाठच्या अंतर्गत भागात शिरते. त्यामुळे अनेक वाडे, घरे, ढासळतात.
दरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेवून गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देवून त्यांना तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी पूर्व नियोजन करण्यात यावे. महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या इमारती, पडके वाडे, पुल यांचे तत्काळ ऑडिट करून संबंधितांना नोटीसा देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने नाशिक व मालेगाव महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पंचवटी, रामकुंड परिसरात पुराच्या पाण्यात वाहने अडकतात किंवा वाहून जातात. अशावेळी सदर ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. तसेच संभाव्य पुर परिस्थितीत वाहने काढण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करून याठिकाणी स्वतंत्र पथके नियुक्त करण्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच अनेकदा पावसाळ्यात झाडे कोसळण्याची संभावना असते. अशावेळी अनेक वाहने झाडाखाली दबली जातात. काहीवेळा रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांच्या लोखंडी फ्रेम्स, झाडे, घरांची पत्रे उडतात. अशावेळी कोणतीही हानी होवू नये यासाठी आवश्यकत्या उपाययोजना करण्यात याव्यात. अशा प्रसंगी मदत करण्यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती करून कटरच्या साहय्याने पडलेली झाडे बाजूला करावीत. वार्डनिहाय शोध व बचावाची स्वतंत्र पथके साहित्यासह नियुक्त करण्यात यावीत. तसेच देवदूत रेस्क्यु वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करून ते वाहन मान्सून काळात जिल्हा नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देण्यात यावे.
जिल्हा नियंत्रण कक्ष
मान्सून काळात सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी त्यांच्याकडील मनुष्यबळ, मशनरी, विद्युत बॅकअप, औषधसाठा, रुग्णवाहिका या प्रकारची साधन सामुग्री तयार ठेवावी. त्याचप्रमाणे पूराच्या परिस्थितीत स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यात येवून तेथे विद्युत अथवा जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. संभाव्य पूरग्रस्त, शोध व बचाव कार्यात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरता निवारा, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबतही नियोजन करण्यात यावे. आपत्ती काळात प्रशासकीय यंत्रणांनी संपर्कात असणे महत्वाचे असल्याने अतिमहत्वाचे क्रमांक असलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती तयार करून जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्यात यावा, अशा सूचना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने महानगरपालिका प्रशासनास दिल्या आहेत.
काझीगढी बाबत अधिक सतर्कता
शहरी भागात अतिवृष्टी झाल्यास काझीगढी येथे दरड कोसळण्याची अधिक शक्यता असते. अशा परिस्थितीत तेथील नागरिकांशी मान्सून पूर्वीच चर्चा करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे त्या नागरिकांना स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्व तयारी व उपाययोजना करण्यात याव्या.