नाशिक : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना (Nashik) अखेर पावसाने दिलासा दिला. दुपारपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या (Nashik Rain) सरींनी नाशिककरांना सुखद अनुभूती दिली.
नाशिक शहरातील कामटवाडे, पवन नगर, अंबड लिंक रोड, राजीव नगर, पाथर्डी फाटा, कॅनडा कॉर्नर, उत्तम नगर, महात्मा नगर, सिडको, पंचवटी, औरंगाबाद रोड, जेल रोड, म्हसरुळ, बारदान फाटा, नाशिकरोड या परिसरात पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलीय. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. गारपीट झाल्यानं शेतातील उभ्या पिकांना फटका बसणार आहे.
बत्ती गुल
सायंकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक भागात वीज गेली. जेलरोड, नाशिकरोड, सिडकोतील काही परिसरात पाऊस आल्याने बत्ती गुल झाल्याचे पाहायला मिळाले.
सकाळी उकाडा, सायंकाळी पाऊस
दरम्यान नाशिकमध्ये सकाळी बारा वाजेपर्यंत उकाडा जाणवत होता. मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. सायंकाळी नाशकात पहिल्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी विलंब होत असल्याचे स्पष्ट केले होते. पुढील 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याची माहिती आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.
चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. चांदवड परिसरात माजी आमदार शिरीष कोतवाल हे अचानक पाऊस सुरू झाल्याने कांदा शेडमध्ये थांबले असतांनाच वादळी वाऱ्यामुळे शेड पडले त्यात ते किरकोळ जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मौजे संसारी येथील सविता बाळासाहेब गोडसे वय 40 यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या मयत झाल्या आहे.