Nashik Bajar Samiti : गेल्या अनेक दिवसांपासून स्थगिती मिळत असलेल्या बाजार समितींच्या (Bajar samiti) निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात सुरवात झाली आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा पटलावर वर्चस्व राखण्यासाठी बाजार समितीची निवडणूक महत्त्वाची असल्याने दिग्गज नेत्यांच्या राजकीय हालचालींना आजपासून वेग येणार आहे. सोमवारपासून बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे.


गेल्या दोन वर्षांमध्ये करोनामुळे (Corona) बाजार समिती निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. या टप्प्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून मुदत संपुष्टात आलेल्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार या निवडणुकांचा कार्यक्रमही (Nashik Bajar Samiti) घोषित करण्यात आला होता. जिल्ह्यात नाशिकसह (Nashik) एकूण 14 बाजार समित्यांचा यात समावेश असल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र त्यानंतर देखील स्थगिती देण्यात आली होती. अखेर पुन्हा एकदा बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात सुरुवात केली आहे. 


दरम्यान येत्या 3 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार असून पुढील काही दिवस जिल्ह्यांतील राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सलग तीनवेळा बाजार समित्यांच्या संचालकपदाच्या निवडणुका रद्द झाल्याने आता होत असलेल्या या निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार आजपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. 27 मार्च ते 3 एप्रिल म्हणजेच आठ दिवसांच्या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निश्चित वेळेपर्यंत दाखल होणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.


नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, मनमाड, नाशिक, चांदवड, कळवण, नांदगाव, मालेगाव, सिन्नर, घोटी, येवला, देवळा, पिंपळगाव बसवंत, लासलगाव आणि दिंडोरी या 14 बाजार समित्यांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू होणार आहेत. बाजार समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी आमदारांसह पक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ आहे.


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम 


निवडणूक निर्णय अधिकारी हे आज रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. त्यानंतर आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होईल. आजपासून ते 3 एप्रिल पर्यंतही मुदत असणार आहे. त्यानंतर मिळालेल्या नामनिर्देशन पत्राच्या यादीचा प्रसिद्धीचा नामनिर्देशासाठी निश्चित केलेल्या शेवटच्या दिनांकापर्यंत मिळतील त्याप्रमाणे नामनिर्देशन पत्राच्या छाननी ही 5 एप्रिल रोजी होईल. छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या यादीचा 6 एप्रिल पासून ते 20 एप्रिल पर्यंत असणार आहे. उमेदवाराची अंतिम यादी 21 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे.