Nashik Long March : "मागचा अनुभव कटू आहे. 2018 च्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च (Nashik Lomg March) थांबणार नाही," असं माजी आमदार जे पी गावित यांनी स्पष्ट केले आहे. तब्बल तीन तासांच्या बैठकीनंतरही तोडगा निघाला नसून नाशिकमध्ये दाखल झालेला लॉन्ग मार्च हा आज मुंबईकडे कूच करणार आहे.


शेतकरी, कष्टकरी आदिवासी बांधव यांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून (12 मार्च) दिंडोरी येथून पायी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. माकप किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांच्या वतीने हा लॉन्ग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून काल सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरु होती. यात पालकमंत्री दादा भुसे यांनी मागण्या मान्य करु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडून आणू असे आश्वासन दिले. मात्र मोर्चेकरी आपल्या निर्णयावर ठाम होते अखेर लॉन्ग मार्च पुढे नेण्याचा निर्णय एकमताने झाल्याचे समोर आले आहे.


हा लॉन्ग मार्च थांबणार नाही : जे पी गावित


बैठकीत माजी आमदार जेपी गावित म्हणाले की, "मागचा अनुभव कटू आहे, 2018 च्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे हा लॉन्ग मार्च थांबणार नाही. जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत लोक चालत राहतील. प्रमुख मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे लोक परत येतील का? लोकांचा आमच्यावर विश्वास राहिल का? पायी येणं लोकांना परवडते, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, म्हणून ते आमच्यासोबत आहेत." 


दरम्यान दिंडोरी येथून लॉन्ग मार्च निघाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं मात्र रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरु होती. चर्चेची फेरी निष्फळ ठरली आहे. तीन तास सुरू असलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसून सकाळी लॉन्ग मार्च सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


दोन दिवस लॉन्ग मार्च स्थगित करा...


दिंडोरी येथून पायी लॉन्ग मार्चला काल दुपारी तीन वाजता सुरुवात झाली यानंतर हळूहळू आणि शेतकरी कामगार वर्ग या मोर्चात सहभागी झाला तर पालकमंत्री दादा भुसे यांनी चर्चा करुन प्रश्न सोडवू असे सांगून बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी ते म्हणाले की दोन दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ. सर्व विभागाचे मंत्री, सचिव यांना बैठकीला बोलावू." परंतु ही बैठक निष्फळ ठरली आहे.