Nashik Jindal Fire : नाशिकच्या (Nashik) इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील जिंदाल कंपनीची (Jindal Company) आग जरी कमी झालेली दिसत असली तरीही अनेक प्रश्नांचा धूर मात्र निघू लागला आहे. कंपनीमध्ये आग लागली, त्यावेळी नेमकी किती कर्मचारी उपस्थित होते? याची माहिती आता कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या सांगण्यास इतका विलंब का झाला हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.


दरम्यान, प्रकरणांमध्ये एक गूढ कायम होतं की ज्या दिवशी अपघात घडला, त्या दिवशी नेमके किती कामगार हे कामावर हजर होते.  कामगार मंत्री सुरेश खडे यांनी केलेल्या पाहणीनंतर घटनेची तात्काळ माहिती सादर करण्याचे आदेश आदेश दिले. त्यानंतर लागलीच कंपनी प्रशासनाकडून घटनेच्या दिवशी 749 कामगार कामावर हजर होते. त्यापैकी 403 कामगार हे कंत्राटी कामगार होते. या सर्वांपैकी 724 कामगार हे आता सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क देखील झालेला आहे. 19 कामगार हे जखमी होते, त्यातील दोन कामगारांचा मृत्यू झालेला आहे. तर सुधीर मिश्रा नामक कामगार जो उत्तर प्रदेशमधून काम करायला होता, तो मात्र मिसिंग असल्याचे समजते आहे. अद्याप त्याचा शोध लागलेला नसून मात्र इतर कामगारांचा तपास लागलेला असून त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. 


त्याचबरोबर कंपनी प्रशासनाने कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराशी संवाद साधत त्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ठेकेदारांनी ज्या कामगारांचा पुरवठा केलेला होता. त्या सर्व कामगारांचा संबंधित ठेकेदारांशी संपर्क झालेला असून ते देखील सर्व सुरक्षित आहेत. विशेष म्हणजे अशा स्वरूपाचा हमीपत्र प्रशासनाने लिहून घेतलेला आहे. दरम्यान घटनेननंतर एका शंका उपस्थित केली जात होती की, काही कामगार मिसिंग आहे, तर अद्याप तशी माहिती समोर आलेली नाही, मात्र एक कामगार मिसिंग असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. त्यासोबत जिंदाल कंपनीमधील आगीच्या घटनेनंतर उद्योगांच्या फायर सेफ्टीचाही मुद्दा ऐरणीवर आला असून आज उद्योग मंत्री उदय सामंत हे आज नाशिक दौऱ्यावर येणार होते. दौऱ्यात जिंदाल कंपनीला भेट देऊन तिथे अधिकाऱ्यांची चर्चा करणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजते आहे. 


कंपनी कामगार सुरक्षा वाऱ्यावर? 
कंपन्यांना औद्योगिक सुरक्षा या नावाखाली जे गोंडस नाव दिले जाते, खरोखर त्याची अंमलबजावणी केली जाते का? हे बघणं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यालाच नव्हे तर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये इतर ज्या काही कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये अशा स्वरूपाची फायर सेफ्टीची काय अंमलबजावणी केली जाते? याबाबत लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. कंपनीमध्ये कर्मचारी वर्ग असतो, त्याची कमतरता प्रामुख्याने भासते आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांची संख्या वाढवणं हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे. 


नेमकं त्या दिवशी किती कर्मचारी हजर होते?
जिंदाल आग दुर्घटनेवेळी 749 कर्मचारी कंपनीत हजर असल्याची माहिती मिळते आहे. यात कायमस्वरूपी 346 आणि 403 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आधी दोन महिलांचा मृत्यू दोन्ही महिला कायमस्वरूपी कर्मचारी होत्या. जखमी झालेल्या 19 कर्मचाऱ्यांपैकी 15 कायमस्वरूपी आणि चार कंत्राटी कर्मचारी होते. 749 पैकी 724 कर्मचारी सुरक्षित असल्याची कंपनी व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली आहे. नातेवाईकांसाठी इगतपुरी तहसील प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.


इगतपुरी तालुक्यातील मौजे मुंढेगाव शिवारात जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 1 जानेवारी 2023 रोजी विस्फोट होवून आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेदरम्यान कंपनीतील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती तालुका आपत्ती नियंत्रण अधिकारी तथा इगतपुरी तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली आहे. 


संपर्कासाठी कार्यान्वित करण्यात आलेले भ्रमणध्वनी क्रमांक
▪️  इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण : 8108851212 
▪️  इगतपुरी तहसिलदार परमेश्वर कासुळे : 9604075535
▪️  निवासी नायब तहसिलदार प्रविण गोंडाळे : 9850440760
▪️  महसुल सहायक नितिन केंगले : 9767900769