नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात (Nashik West Assembly Constituency) महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मात्र आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. 


महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या माकपच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप माकपचे उमेदवार डॉक्टर डी एल कराड (Dr D L Karad) यांनी केला आहे. नाशिक पश्चिमची जागा माकपला सुटावी, अशी मागणी डाव्या आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाने त्यांचा उमेदवार दिला. शरद पवारांनी आपला शब्द पाळला नाही असा आरोप करत माकपच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला असून ते आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. 


नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत


दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारापाठोपाठ माकपचा उमेदवार देखील रिंगणात आहे. तर मनसेकडून दिनकर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी महापौर दशरथ पाटील स्वराज्य पक्षात माजी महापौर दशरथ पाटील यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते दशरथ पाटील यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे पत्र म्हणजे एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सीमा हिरे आपला गड राखणार की परिवर्तन होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


2019 च्या निवडणुकीची स्थिती


दरम्यान, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक भाजपच्या उमेदवार सीमा हिरे विजयी झाल्या होत्या. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपूर्व हिरे आणि मनसेच्या दिलीप दातीर यांच्याशी झाला होता. सीमा हिरे यांना 78 हजार 41 मतं मिळाली होती. तर अपूर्व हिरे यांना 68 हजार 295 मतं, दिलीप दातीर यांना 25  हजार 501 मतं मिळाली होती.  


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Elections 2024 : इगतपुरी विधानसभेत मनसेनं पत्ता टाकला, शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याला तिकीट, हिरामण खोसकरांना तगडं आव्हान