Maha Shivratri 2025 : यंदाची महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार असून शिवभक्तांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. याच दिवशी लाखो भक्त भगवान शंकराचे दर्शन घेतात. भारतात अनेक शिव मंदिर आहेत. मात्र, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात (Trimbakeshwar Mandir) दरवर्षी हजारो भाविक दर्शनसाठी येतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्के महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जात आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला पहाटे चार वाजल्यापासून ते 27 तारखेच्या रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर राहणार 24 तास सुरू आहे. तसेच, दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता सर्व प्रकारचे व्हिआयपी, प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी (दि.26) रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
महाशिवरात्री निमित्त ट्रस्टची जय्यत तयारी
दरम्यान, महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे त्तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.24) मेहंदी तसेच मंगळवारी (दि. 25) हळदीचा समारंभ होणार आहे. सायंकाळी बासरी वादन कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि.26) दुपारी श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघेल. पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. पालखी दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत. ट्रस्टतर्फे बुधवारी (दि. 26) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या