नाशिक : येथील कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Mandir) दानपेटीवरून सप्टेंबर महिन्यात दोन गुरवांमध्ये वाद झाला. या वादाचे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. यानंतर धर्मादाय आयुक्तांनी 25 सप्टेंबरला मंदिरातील पाच दानपेट्या सिल केल्या होत्या. आता सिल केलेल्या दानपेट्या आज उघडण्यात येणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षकाकडून या दानपेटीमधील पैशांची मोजणी केली जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून कपालेश्वर मंदिरातील पेट्यांबाबत वाद आहे. मंदिरात चार दानपेट्या ट्रस्टच्या व एक पेटी गुरवांची आहे. या पेटीवरही प्रभाकर गाडे, हेमंत गाडे, अनिल भगवान, प्रभावती जगताप, अतुल शेवाळे या पाच गुरवांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. त्यांनी महिने आणि तिथी वाटून घेतली असून त्यानुसार पेटीच्या चाव्या एकमेकांकडे सुपूर्द केल्या जातात.
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी
ही गुरव मंडळी अनधिकृतपणे पेटी ठेवून भाविकांची दिशाभूल करीत असल्याने विद्यमान विश्वस्त व सर्व गुरव यांच्यात कोर्टात दावा सुरू आहे. या पाच गुरवांपैकी प्रभाकर गाडे व हेमंत गाडे यांच्यातही एकमेकांविरोधात कोर्टात दावे आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रभाकर गाडे यांच्याकडे कपालेश्वर मंदिराचा कार्यभार होता. त्यामुळे दानपेटीच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. हा कार्यभार सप्टेंबरमध्ये संपला होता. नवीन कार्यभार हेमंत गाडे यांच्याकडे देणे गरजेचे होते. मात्र प्रभाकर गाडे यांनी तो हेमंत गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली होती.
गुरव आणि ट्रस्ट वादावर धर्मादाय आयुक्त तोडगा काढणार
यानंतर धर्मादाय आयुक्तांनी 25 सप्टेंबरला मंदिरातील पाच दानपेट्या सिल केल्या होत्या. या दानपेट्या आता पूर्ण भरल्या आहेत. आता सुमारे दोन महिने उलटल्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षकाकडून या दानपेट्यांच्या पैशांची मोजणी करण्यात येणार आहे. पैशांनी मोजणी झाल्यानंतर या संदर्भात गुरव आणि ट्रस्ट या वादाबाबत अंतिम तोडगा धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. आता धर्मादाय आयुक्त नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या