Kalaram Mandir नाशिक : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. तसेच नाशिकच्या काळाराम मंदिरालादेखील विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. तसेच 22 जानेवारीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळारामाचे दर्शन घेणार आहे. तसेच यावेळी अनेक दिग्गज नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत.  त्यामुळे नाशिकला राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. नाशिकचे काळाराम मंदिर हे पौराणिकदृष्ट्या तर महत्वाचे आहेच. मात्र, मागील काही दिवसांपासून काळाराम मंदिराचे  राजकीयदृष्ट्याही महत्व वाढल्याचे दिसून येत आहे. 


याच पार्श्वभूमीवर श्री काळाराम मंदिरात पाच ते सहा सशस्त्र अतिरेक्यांनी घुसखोरी करत, देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर अचानक बेछूटपणे गोळीबार करत भाविकांना बंधक केल्याची माहिती परिसरात पसरली. यामुळे सर्वच शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती. मंदिरात अतिरेक घुसले अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली.  


पोलीस पथक तातडीने काळाराम मंदिराकडे रवाना


यानंतर काही वेळातच पोलीस पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, आर्टिलरी पथक, पोलीस कृतिदल, दंगल नियंत्रण पथक यांच्यासह गुन्हा शोध पथकाचे कर्मचारी पोलिस अधिकारी काळाराम मंदिर परिसरात दाखल झाले आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले. 


दोन अतिरेक्यांना कंठस्नान, स्फोटके जप्त


पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये तब्बल दीड जोरदार लढाई झाली. अखेर पोलीस पथकाने काळाराम मंदिरात घुसखोरी करणाऱ्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. तर उर्वरित चौघांकडून घातक शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केले.


काळाराम मंदिर परिसरात पोलिसांकडून मॉकड्रील


अतिरेकी घुसल्याची बातमी समजताच संपूर्ण शहराची धाकधूक वाढली होती. काही वेळाने पोलिस प्रशासनातर्फे सुरक्षिततेच्या दृष्टीने व सोमवारी (दि.२२) अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने राम मंदिरात मॉकड्रील केल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 


इतके अधिकारी झाले सहभागी


पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त नितिनजाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, आडगाव पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, म्हसरुळ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे आदींसह पोलिस अधिकारी, तसेच ११५ कर्मचारी, पोलीस शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक व नाशक पथक दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, वाहतूक शाखा या मॉकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. 


आणखी वाचा


Nashik Kalaram Mandir : पंतप्रधान मोदी ते उद्धव ठाकरे नतमस्तक, राजकीयदृष्ट्या महत्व आलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास काय?