नाशिक : इतर राज्यात माझा पक्ष शिवसेनेपेक्षा स्ट्राँग असून मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा उमेदवार फक्त 183 मतांनी पराभूत झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेत शिवसेनेला 3-4 जागा तरी येतील की नाही ही शंका असून विधानसभेत तर त्यांचा पानिपतच होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही महाराष्ट्रात शिवसेनेने अडीच अडीच वर्ष फॉर्म्युलावर एकत्र यावं, शिवसेनेला भाजपशिवाय भवितव्य नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. 


यासोबतच पंजाबमध्ये आम्हाला सत्ता मिळेल अशी परिस्थिती नव्हतीच, परंतु अकाली दल आमच्यासोबत आला असता तर सत्ता मिळाली असती आणि आप 40 जागेच्या पुढे गेले नसते असं त्यांनी मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन मायावती यांनाही टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा जनाधार रिपब्लिककडे वळत असून दलितांचे 25 ते 30 टक्के मतं भाजपला मिळाल्याने आमचा विजय झाला, असं रामदास आठवले म्हणाले.


भाजप सगळ्या जाती-धर्माचा पक्ष बहुमत
भाजपला बहुमत मिळण्याचे कारण म्हणजे भाजप ही पहिल्यासारखी राहिलेली नाही. तो आता सगळ्या जाती-धर्माचा पक्ष झाला आहे. कोरोना काळात 80 कोटी लोकांना दोन अडीच वर्ष मोफत धान्य, लस यांच्यासह इतर सुविधा लोकांना मिळाल्या, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.


दलितांचे 25-30 टक्क्यांपेक्षा जास्त मते भाजपला 
उत्तर प्रदेशात आपल्यालाच सत्ता मिळेल, अशी आशा समाजवादी पक्षाला होती. परंतु नरेंद्र मोदींची ताकद किती मोठी आहे याची कल्पना अखिलेश यादव यांना नाही. यूपीचा निकाल म्हणजे अखिलेश यादव यांना मोठा झटका आणि काँग्रेसला मोठा फटका आहे. जनतेने बहुजन पार्टीला नाकारले आहे. मायावतींचा जनाधार हळूहळू त्यांच्यापासून दूर होत असून तो रिपब्लिककडे वळतो आहे. मी लोकांना अपील केले होते की तुम्ही आतापर्यंत बहिणीला पाहिले होते, आता भावाकडे पाहा आणि लोकांनी मला प्रतिसाद दिला. दलितांचे 25-30 टक्क्यांपेक्षा जास्त मते भाजपला मिळाली त्यामुळे भाजपला मजल मारता आली.


काँग्रेसला भवितव्य नाही : आठवले
2024 मध्ये सुद्धा भाजप आणि एनडीएचे सरकार येईल आणि मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, "भाजपचा सामना करण्यासारखा एकही पक्ष राहिलेला नाही. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस वाढेल अशी स्थिती नाही. राहुल गांधी यांच्याऐवजी उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांना पुढे करण्यात आलं, पण त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेसला पुढे भवितव्य दिसत नाही.


विधानसभेत शिवसेनेचं पानिपत होणार
शिवसेनेला बाहेरच्या राज्यात यश मिळण्याचा प्रश्नच येत नाही असा दावा रामदास आठवलेंनी केला. "माझा पक्ष इतर राज्यात शिवसेनेपेक्षा स्ट्राँग आहे. मणिपूरमध्ये माझा उमेदवार फक्त 183 मतांनी पराभूत झाला आहे. महाराष्ट्रात लोकसभेत त्यांना 3-4 जागा तरी मिळतील की नाही ही शंका आहे. विधानसभेत तर त्यांचा पानिपतच होणार आहे," असं आठवले म्हणाले. 


शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युल्यावर एकत्र यावं
"महाविकास आघाडीचे प्रचंड नुकसान होणार आहे. पवार साहेब जरी म्हणत असले तरी लोकांच्या मनात चित्र वेगळेच आहे. मागच्या वेळी त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युलावर एकत्र यावं, शिवसेनेला भाजपशिवाय भवितव्य नाही," असं रामदास आठवले यांनी सांगितलं.