नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासोबत भेट होताच शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे (Shinde Group) नेते हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी त्यांचे चरणस्पर्श केले. रामनवमीनिमित्ती दोन्ही नेते नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाला पोहोचले होते. यावेळी छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झाली. महायुतीत असलेले हे दोन्ही नेते नाशिक मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. असं असताना या दोघांची भेट होणं आणि गोडसेंनी भुजबळांचे आशिर्वाद घेणं, या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीचा नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, त्यामुळे लोकसभेचं तिकीट नेमकं कुणाला मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भुजबळ आणि गोडसेंची भेट
नाशिकच्या काळाराम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झाली. यावेळी हेमंत गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतले. रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसे जात होते. त्याचवेळी छगन भुजबळ दर्शनासाठी आले, त्यावेळी दोघांची भेट झाली. दोघेही नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
उमेदवारीची संधी आणि विजय मिळो : गोडसे
छगन भुजबळांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात, त्यामुळे रामाचे दर्शन झाल्यानंतर भुजबळांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले. हे आशीर्वाद नक्की कशासाठी घेतले, ते प्रभू रामचंद्रांना माहिती, असं गोडसे म्हणाली आहेत. आपल्याला उमेदवारीची संधी लवकर प्राप्त होवो आणि विजय पण मिळो ही आज काळारामाकडे प्रार्थना केल्याचं हेमंत गोडसेंनी सांगितलं आहे. एक-दोन दिवसात नाशिकचा निर्णय होईल. 10 वर्षे मी खासदार राहिलोय, नाशिकला पुन्हा धनुष्यबाण येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महायुतीचं घोडं नेमकं कुठं अडलं?
महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, ठाणे लोकसभेची जागा ही भाजपने मागितली आहे. लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या शिवसेनेच्या खासदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जागा मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेवर दबाव दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ठाणे आणि नाशिक जागा आपल्याकडेच राहावी, यासाठी इतर दोघांवर दबाव यासाठी भाजपचा आपल्या इतर दोन मित्र पक्षांवर दबाव पाहिला मिळत आहे. त्यामुळे अद्याप जागावाटप पूर्ण होऊ शकलेलं नाही. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबाव तंत्राचं राजकारण केलं जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पाहा व्हिडीओ : नेमकं काय म्हणाले हेमंत गोडसे?