नाशिक: राज्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दरवर्षी व्यापाऱ्यांकडून (Traders) फसवणूक केली जाते. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या द्राक्ष (Grapes Farmers) बागायतदार संघाकडे या संदर्भात तक्रार केली आहे. तरी इतर शेतकऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. द्राक्षाच्या व्यवहारातील पैशांची फसवणूक झाल्याची लेखी स्वरुपात तक्रारी आणि निवेदन द्राक्ष बागायतदार संघाकडे प्राप्त झाले असून एकट्या नाशिक जिल्ह्यातून 700 अर्ज द्राक्ष बागेतदार संघाकडे प्राप्त झाले आहेत. तर राज्यातील आकडा हजारो शेतकऱ्यांचा असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे व्यापाऱ्यांकडून फसवणूक केली जाते. यंदाही हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी द्राक्ष बागायतदार संघाकडे प्राप्त झाले आहेत. तर इतर शेतकऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात लेखी अर्जही दाखल केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकरी असून या शेतकऱ्यांना कोटींचा गंडा घालून व्यापारी पळून गेले असून गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना विकलेल्या द्राक्ष मालाचा परतावा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी आता द्राक्ष बागायतदार संघाकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.


शेतकऱ्यांनी जगवण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत; द्राक्ष बागायतदार संघटनेची मागणी


महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी 26 ऑगस्ट रोजी राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. मात्र, पंधरा दिवस उलटूनही अद्याप पोलीस प्रशासनाकडून फसवणुक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही मदत होत नसल्याचे म्हटले आहे. तर वारंवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना बघता द्राक्ष उत्पादक शेतकरी जगावा यासाठी सरकारने तात्काळ योग्य ते पाऊल उचलावी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकी थांबवण्यासाठी कायदा करावा अशी मागणी केली आहे. 


नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक द्राक्षाचे उत्पन्न नाशिक जिल्ह्यात घेतले जातात. त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यात सातशे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून जवळपास 50 ते 70 कोटींची फसवणूक करून व्यापारी पळून गेले असल्याची माहिती नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गडाख यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडे पुरावे नसल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोपही द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत.


आणखी वाचा


द्राक्ष बागायतदारांना साडेतीन कोटींना गंडा घालणाऱ्या तीन व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या