Girish Mahajan : नाशिकजवळील माडसांगवी येथील 36 शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपये किमतीची सुमारे 50 एकर जमीन बेनामी व्यवहार करून हडपल्याचा खळबळजनक आरोप शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), सुनील झंवर आणि भारत स्टील ट्युब्स लि. कंपनी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच सदर व्यवहार तत्काळ रद्द करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. आता यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकजवळील माडसांगवी येथील 36 शेतकऱ्यांनी सुमारे 50 एकर जमीन गुरे चारण्यासाठी पडीक ठेवली होती. मात्र, गावातील काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रे तयार करून ही जमीन 1982 साली भारत स्टील ट्युब्स लिमिटेड (नवी दिल्ली) या कंपनीला विकल्याचा दावा करण्यात आला. या व्यवहाराला काही शेतकऱ्यांनी विरोध करून प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांनी याप्रकरणात आक्षेप घेत सांगितले की, ही जमीन खासगी मालमत्ता असल्याने तिचा कोणत्याही कंपनीशी व्यवहार होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाचे नाव या क्षेत्रावर नोंदवण्यात आले. त्यानंतर भारत स्टील ट्युब्स लि. कंपनीच्या संचालकाने गिरीश महाजन यांच्याशी निकट संबंध असलेल्या जळगाव येथील सुनील देवकीनंदन झंवर यांच्याशी संपर्क साधला. पुढे काही बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टील कंपनीचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यात आले.
प्रत्यक्ष सूत्रधार गिरीश महाजनच, शेतकऱ्यांचा आरोप
2015 मध्ये सुनील झंवर यांनी ही जमीन शासकीय मूल्याप्रमाणे 3 कोटी 3 लाख 3 हजार तीस रुपयांना विकत घेतली. जरी व्यवहार कागदोपत्रांवर झंवर यांच्या नावे असला, तरी हा बेनामी व्यवहार असून प्रत्यक्ष सूत्रधार गिरीश महाजनच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शेखर देसाई यांच्याकडे महसुली नियमानुसार तक्रार करण्यात आली होती. सुनावणीनंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून सदर जमीन परस्पर एका कंपनीला विकण्यात आली, असे शेतकर्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
या आरोपावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आरोप करणे सोपे झाले आहे. कोणी त्या संबंधात कागदपत्र दाखवावी. तो माझा जरी मित्र असेल तरी त्याने रीतसर जमीन घेतली आहे. आरोप करणारा कोण आहे? त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे? त्याची माहिती घेतली पाहिजे. कोणीही ब्लॅकमेलिंगसाठी काय करत आहे ते आपण तपासले पाहिजे. माझं नाव कुठे असेल तर त्या संदर्भातील कागदपत्र दाखवावे. माझ्या संदर्भातील काही जमीन घेतली, काही फार्म हाऊस घेतले, त्या संदर्भातील कागदपत्र दाखवावे. मात्र असे कुठेही नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा