Girish Mahajan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 18 जानेवारीला पालकमंत्रीपदांची घोषणा केली होती. नाशिक जिल्ह्यासाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र या नियुक्तीला शिंदे गटाच्या नेत्यांनी विरोध केल्याने अवघ्या एक दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या (Nashik Guardian Minister) निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आज सहा महिने होऊन देखील नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिकमधून कोण पालकमंत्री होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असता गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलाय.   

Continues below advertisement

पुढील वर्षापासून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही असल्याचे बोलले जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्याची तयारी देखील सुरु आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे दादा भुसे हे देखील नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ हे देखील पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे अद्याप महायुतीत हा तिढा सुटलेला नाही.

कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्यावरच : गिरीश महाजन

नाशिकमध्ये कुंभमेळा असल्याने भरघोस निधी नाशिकसाठी येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना नाशिक पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल. मात्र, तो निर्णय काहीही असला तरी कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्यावरच आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Continues below advertisement

24 हजार कोटींचा विकास आराखडा

दरम्यान, नाशिक महापालिकेने सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला आहे. तर अन्य नऊ विभागांनी नऊ हजार कोटी असा एकूण 24 हजार कोटींचा विकास आराखडा सादर केला आहे. मात्र, या आराखड्याला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातही या आराखड्यासाठी निधीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. यावेळी सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा काढण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. महापालिकेकडून गोदावरी, वालदेवी आणि नंदिनी या नद्यांवरील पाच पुलांसह इतर काही पुलांच्या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधिकरण करण्याच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे प्राधिकरणाची सूत्रे सोपवण्यात आली आहे.  

नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा

31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होणार असून दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. 29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होणार आहे. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर दुसरे अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरे आणि शेवटचे अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल. तर 24 जुलै 2028 रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील. 

आणखी वाचा 

Girish Mahajan on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मुलाखत येताच गिरीश महाजनांचा पुन्हा खळबळजनक दावा; म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार...