Nashik Central Jail : नाशिक कारागृहात यंदाही वेगवेगळ्या रुपातल्या आकर्षक व सुबक गणपतीच्या मुर्त्या घडल्या. कैद्यांनी बनवलेल्या पर्यावरण पुरक बाप्पाच्या मूर्तींना भाविकांनी देखील पसंती दिली. जवळपास 545 गणेश मूर्ती विकल्या गेल्या असून त्यातुन कारागृहाच्या गल्ल्यात नऊ लाख बारा हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे. विशेष म्हणजे कैद्यांनी बनवलेली लालबाग राजाची मूर्ती राजभवनात देखील विराजमान झाली होती.
चालू वर्षी सन 2022 मध्ये सुमारे 560 गणेश मुर्ती साकारण्यात आल्या असून त्यामध्ये फेटा, गाय जास्वंद, त्रिमुखी, दगडुशेठ, लालबाग, गादी, वक्रतुंड देताघेता, लंबोधर, कमळ इत्यादी विविध प्रकारच्या अत्यंत सुबक व आकर्षक गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. सुमारे 12 कैद्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. दिनांक 15 ऑगस्टपासून कारागृहाचे प्रगती विक्री केंद्र येथे गणेश मुर्ती विक्री करीता ठेवण्यात आल्या होत्या, गणेश मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावर्षी तयार करण्यात आलेल्या 560 पैकी 545 शाडू मातीच्या गणेश मुर्ती विक्री झालेलो असून शासनास,नऊ लाख १२ हजार रुपये इतका महसूल प्राप्त झालेला आहे. ५६० नग गणेश मूर्ती तयार करायाकरीता रक्कम चार लाख 12 हजार रुपये इतका खर्च आला होता. तसेच प्रथमच येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनीही सुमारे 265 गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. येरवडा कारागृहात या कैद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक कारागृहातील दोन प्रशिक्षित कैदी दोन महिन्यांपूर्वी येतात. 265 गणेशमूर्तींपैकी सुमारे 122 मूर्तींची विक्री होऊन 1.36 लाख रुपयांची कमाई झाली आहे.
विसर्जनाकरीता 71 ठिकाणांची निश्चिती
नाशिक मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता शहरात 71 ठिकाणे निश्चित झाली आहेत. तब्बल दोन वर्षानंतर शहरात गणेशाचे (Ganesh) आगमन मोठ्या थाटामाटात झाले. तसेच दीड दिवसांचे गणेशाचे विसर्जनही करण्यात आले. यानंतर दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नाशिक मनपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवाय रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. तसेच मिरवणुकीच्या मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच बांधकाम विभागाकडून डांबर आणि खडीच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्णत्वास गेल्यावर आता गणेश विसर्जन ठिकाणी कामे केली जात असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.
अधिकाधिक मूर्ती दान कराव्यात
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांचे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये. मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांवर त्यांच्या मूर्ती दान द्याव्यात तसेच निर्माल्यदेखील संकलन केंद्रांवर जमा करण्यात यावे. नागरिकांना दीड, तीन, पाच, सात दिवसाच्या मुर्तींचे विसर्जनाकरिता नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील. कृत्रीम विसर्जन स्थळे हे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जना करीताच उपलब्ध असतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.