Nashik Crime : फिंगरप्रिंट चोरून संशयितांनी आधार एनेबल पेमेंट सिस्टीमद्वारे (एईपीएस) (Aadhhar) लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Oniline Fraud) केल्याचे उघडकीस आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव (Nashik) तालुक्यातील पळाशी येथील नागरिकांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणाऱ्या तरुणांसह दोघांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदगाव पोलीस ठाणे (Nandgaon Police) हद्दीतील पळाशी गावामधील काही नागरीकांचे बँक खात्यांवरून (Bank Account) ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे काढून घेतले जात होते. या प्रकरणाबाबत नागरिकांनी संबंधित बँक मॅनेजरकडे तक्रार केली असता, त्यांना समर्पक माहिती न मिळाल्याने त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी चौकशी केली असता पळाशी गावातील 15 लोकांचे आधार इनेबल पेमेंट सिस्टीम सेंटर येथून अंगठयाचे ठशांव्दारे 2 लाख 66 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने परस्पर काढून घेतल्याचे समोर आले.
समाधान संजय घुगे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. पोलिसांनी संबंधित आधार सेंटरच्या माध्यमातून संशयितांचा मग काढला. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यातून किशोर सोनवणे, रवींद्र गोपाळ, सोमनाथ भोंगाळ यांना ताब्यात घेत चौकशी केली असता पैसे काढल्याची कबुली दिली. सोनवणे हा प्रधानमंत्री साक्षरता अभियान अंतर्गत रजिस्ट्रेशनचे काम करत होता. तो धुळ्यात संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. संशयितांनी आधार अपडेशन कॅम्प आयोजित केला होता. नागरिकांचे बायोमेट्रिक फिंगर स्कॅनद्वारे अंगठ्याचे ठसे घेत सीएससी डीजीपे ऑनलाईन मनी ट्रान्सफर सर्व्हिस अॅपमध्ये ठशांचा वापर करत बँकेचा डाटा संकलित करत दोन लाख 66 हजारांची रक्कम काढली होती. संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल स्मार्टफोन, फोर फिंगर स्कैनर मशिन, आयरीस मशिन असे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.
नाशिक पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासनमान्य आधारसेवा केंद्रावर जाऊनच आपली आधार संबंधीत माहिती अद्यावत करावी. कोणीही इसम अशाप्रकारे अनाधिकृत आधार अपडेशन कॅम्प घेत असेल तर नजीकचे पोलीस ठाणेशी तात्काळ संपर्क करावा. तसेच आधारकार्ड अद्यावत करण्याचे नावाखाली AEPS (आधार ईनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटरव्दारे ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरीत संबंधीत बँक शाखा, नजीकीचे पोलीस ठाणे अथवा नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाणे (0253-200408) इथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.