Nashik Sanjay Raut : आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) असून सध्याच्या सरकारचे काही खरं नाही. कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. आज एकीकडे आंदोलने होत असताना दुसरीकडे मात्र सरकार व्यस्त आहे. लवकरच भाजपाला (BJP) जोडून गेलेले शिवसेनेत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) येणार नाही, त्यांना आम्ही घेणारही नाहीत, असा सणसणीत टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. 


नाशिकमध्ये (Nashik) आज संजय राऊत असून ते मालेगावला जाणार आहेत. येत्या 26 मार्चला मालेगाव (Malegaon) शहरात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची जंगी सभा आहे. या सभेच्या पाहणीसाठी संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये सभा झाली. त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी देखील सभा घेण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे मालेगावमध्ये 26 तारखेला सभा होत असून उत्तर महाराष्ट्राची ही सभा होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 


मालेगावचा उल्लेख करताना संजय राऊत म्हणाले की, हिरे कुटुंब हे राजकारणातील एक महत्वाचे कुटुंब आहे. अद्वय हिरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. त्याचबरोबर मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, गद्दारांचा नाही, असा टोलाही भुसे यांचे नाव घेता लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, मुस्लीम समाज फक्त मोदींनाच पाठिंबा देणार का? राज्यातील मुस्लीम समाज आमच्या पाठीमागे उभा आहे. एकीकडे राज्यात अराजकता निर्माण झाली आहे आदिवासी रस्त्यावर आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकार आहे का नाही, परिस्थिती आहे. मंत्रिमंडळ विस्तार का रखडले आहे, कधी घरी जावे लागेल हे त्यांना माहिती असल्याचे सांगत जोरदार निशाणा साधला. 


आम्ही शिंदेंना घेणार नाही


संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्याचे राजकारण लोकांना ठावूक झाले आहे. लोक वैतागले आहे. सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे. लवकरच हे सरकार पडणार असून शिवसेनेतून बाहेर पडलेला गट पुन्हा शिवसेनेत येणार आहे. मात्र एकनाथ शिंदे वगळता सर्व शिवसेनेत येतील, शिवाय आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणार नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढणार, जागा वाटपावरुन वाद होणार नाही याची खात्री मी देतो. महापालिका संदर्भात देखील चर्चा सुरु आहे, ज्या मोठ्या महापालिका आहेत, त्या ठिकाणी एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले. 


मुंडे-महाजन असते तर परिस्थिती वेगळी असती.... 


दरम्यान सिन्नर येथील नांदूर शिंगोटेमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येत आहे. या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला फडणवीस यांना का बोलावले नाही, माहित नाही. मुंडे लोकनेते होते. पण मुंडे यांच्या काळात शिवसेना भाजप युती टिकावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुंडे-महाजन असते तर परिस्थिती वेगळी असती. मुंडे यांच्या स्मारकासाठी आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना निधी देण्यात आला होता, स्मारक उभारणीसाठी आदित्य ठाकरे यांचे योगदान असल्याचे राऊत म्हणाले.