Latest Nashik News in Marathi: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी शुक्रवार सहा जानेवारी, 2023 रोजी नामनिर्देशनच्या दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती सह निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे. 

 

नाशिक पदवीधर निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप एकाही उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज दाखल केला नसल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. दरम्यान 5 व 6 जानेवारी, 2023 रोजी एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे उमेदवार शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2022-23चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दि.12 जानेवारी, 2023 असा आहे. तथापि, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील 2 जानेवारी रोजीच्या पत्रानुसार पहिला शनिवार  7 जानेवारी  रोजी  नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील, अशी सहा.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 

 

महिन्याचा दुसरा शनिवार व चौथ्या शनिवार हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस म्हणून केंद्र शासनाचे वित्त मंत्रालयाकडून घोषित केलेले आहे. त्यामुळे दि.7 जानेवारी,  2023 रोजी पहिल्या शनिवारी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2022-23 चा कार्यक्रम जाहीर झालेला असून नाशिक विभागात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकी ची आचारसंहिता लागू करण्यात आली असेल, अशा ठिकाणी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने 9 जानेवारी,2023 रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे उपायुक्त (महसूल) संजय काटकर यांनी कळविले आहे.

 

दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत  तशा सूचना दिल्या आहेत. मतदान 30 जानेवारी,2023 रोजी आणि मतमोजणी 2 फेब्रुवारी, 2023 रोजी होणार आहे. तसेच निवडणूक नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.