Devendra Fadnavis Nashik Visit नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे (Nashik) राजकीय महत्व कमालीचे वाढले आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नाशिक दौऱ्यावर होते. मोदींनी काळाराम मंदिराचे (Kalaram Mandir) दर्शन घेतले. त्यांचा जंगी रोड शो देखील नाशकात पार पडला. 22 जानेवारीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकला हजेरी लावली. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. तसेच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही नाशिकमध्ये पार पडली. यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक पक्षाकडून दावा केला जातोय. काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटानंतर भाजप देखील नाशिक लोकसभा मतदारसंघावर (Nashik Lok Sabha Constituency) दावा करण्याच्या तयारीत आहे.  


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी नाशिक येथील भाजपचे पदाधिकारी नाशिक लोकसभेची मागणी करणार असल्याची माहिती भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी विजय साने (Vijay Sane) आणि नाशिक लोकसभा भाजप प्रमुख केदा आहेर (Keda Aher) यांनी दिली आहे. 


नाशिकची जागा भाजपकडे घेण्याची मागणी करणार


देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरात तीन आमदार, महापालिकेची सत्ता आणि मजबूत संघटन असल्याने नाशिकची जागा भाजपकडे घ्यावी, अशी स्थानिक  पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका आहे. 


नाशिक लोकसभेत शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद


भाजपकडे अनेक उमेदवार आहेत. कोणालाही उमेदवारी द्यावी. नाशिक लोकसभेची जागा आधी भाजपकडे होती, युतीमध्ये तत्कालीन शिवसेनेला जागा सोडण्यात आली होती. मात्र शिवसेनेपेक्षा नाशिक लोकसभेत भाजपची ताकद जास्त आहे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 


शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न


फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्ताने शिंदे गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिंदे गटाचे हेंमत गोडसे हे सध्या नाशिक लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये महायुतीच्या जागा वाटपात मिठाचा खडा पडणार असून पक्षाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


भाजपच्या दिनकर पाटलांकडून उमेदवारीची घोषणा


हेमंत गोडसे यांच्या कारकिर्दीत विकासकामे झाली नाहीत, असा दावा करत भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी अलीकडेच स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केलीय. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला पाठींबा दिला आहे. गोडसेंना डावलून पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी करणार आहोत, असे अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज रायते आणि महानुभाव पंथाचे पदाधिकारी  ईश्वरभक्त भाईदेव मुनी यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


नाशिक लोकसभा : हेमंत गोडसे हॅटट्रिक करणार? दिनकर पाटलांची जोरदार तयारी, समीर भुजबळांकडूनही दावा!