Nashik Guardian Ministers : नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेली चुरस थांबली असून धक्कातंत्राचा वापर करीत मंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर नाशिकमध्ये मात्र गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असतांना मात्र शिंदे गटाने धक्कातंत्राचा वापर भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पालकमंत्री पदापासून दूर गेलेले मंत्री दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
एकीकडे मंत्री गिरीश महाजन यांचे नाव सुरवातीपासून चर्चेत होते. त्यानंतर दादा भुसे यांचे नाव जोडले गेले. तर स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान महाजन यांना गेल्यामुळे अप्रत्यक्षपणे पालकमंत्री पदाचा झेंडा ही त्यांच्याच हाती गेल्याचे संकेत प्राप्त झाले होते. त्यानंतर महाजनच नाशिकचे पालकमंत्री म्हणून नाशिककरांमध्ये समज झाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या घोषनेने सर्व चित्रच बदलून गेले आहे. तर दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला असावा, असे या यादीच्या माध्यमातून दिसते.
मंत्री गिरीश महाजनांना धक्का?
मुंबई पुणे ठाणे अंतर नाशिकला राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या सत्ता काळात भाजपने महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद दिले होते. महाजनांच्या नेतृत्वात नाशिक महापालिकेत भाजपची 2017 ला एकहाती सत्ता आली. 2019 मध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे महाजन हेच पालकमंत्री असतील अशी अटकळ होती, मात्र दादा भुसे व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ही नावाची चर्चा होती. शिवाय ध्वजारोहणाचा मान महाजनांना मिळाल्यामुळे त्यामुळे त्यांचे पालकमंत्री पद निश्चित मानले जात होते.
शिंदें सेनेचा भाजपला धक्का?
दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पालकमंत्री पदाची धुरा सोपवणार हे निश्चित होते. त्यामुळेच स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण देखील महाजन यांच्या हस्ते पार पडले. शिवाय सिन्नरच्या नुकसान ग्रस्त भागात देखील महाजन यांनी पाहणी केल्याने नाशिकचे पालकमंत्री महाजनच अशी धारणा झालं8 होती. या सगळ्यात दादा भुसे बाहेर पडले होते. मात्र आज जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीत नाशिकच्या पालकमंत्री पदी मंत्री दादा यांची वर्णी लागल्याने शिंदे सेनेकडून भाजपला एक प्रकारे धक्का दिल्याचे बोलले जात आहे. या सर्वात नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा दादा भुसेकडे देऊन धक्कातंत्राचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे.