Kisan Sabha Protest : माकप आणि किसान सभेचे नाशिकमध्ये (Nashik) गेल्या आठ दिवसांपासून विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. आतापर्यंतच्या प्रशासनासोबतच्या 5 बैठका निष्फळ ठरल्या आहेत. आज पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या सोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे बैठक होणार आहे. या बैठकीआधी दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) मोठं वक्तव्य केले आहे. 


दादा भुसे म्हणाले की, माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या आणि इतर मागण्यांच्या संदर्भात नाशिकमध्ये आंदोलन सुरु आहे. आंदोलन सुरु होण्याच्या पूर्वीच त्यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली होती. नाशिक पातळीवरील ज्या समस्या आहेत. त्या अतिशय जलद गतीने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरु झालेली आहे.   


75 टक्के विषय मार्गी लावण्याचा निर्णय


आंदोलकांच्या काही अशा मागण्या आहेत ज्या राज्य आणि केंद्र पातळीवरील आहेत. त्यामुळे चार-पाच दिवसांपूर्वीच महसूल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत जवळपास 75 टक्के विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 


 जे. पी. गावीत आंदोलन मागे घेतील असा विश्वास


आंदोलकांच्या आणखी काही सूचना आणि मागण्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी गतीने सुरु आहे. गावित साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे होते, तातडीने अंमलबजावणी करा. आता अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Shama) यांच्या बंधूंचे निधन झाले आहे. त्यामुळे आज ते कौटुंबिक कारणास्तव त्यांच्या गावी गेले आहेत. आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. गावित साहेबांचे समाधान आम्ही केलेले आहे. मला विश्वास आहे की, गावित साहेब हे शासनाच्या विनंतीचा सन्मान राखून आपले आंदोलन मागे घेतील, असे विश्वास दादा भूसेंनी (Dada Bhuse) यावेळी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Majha Maharashtra Majha Vision 2024 : लवकरच मोठा चेहरा अजित पवारांकडे येणार, सुप्रिया सुळेंचेही स्वागत; प्रफुल पटेलांचे माझा व्हिजनवर सूचक वक्तव्य


Majha Maharashtra Majha Vision 2024 : 'ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा'; सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आव्हान