Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : ओबीसींच्या आंदोलनावेळी छगन भुजबळांनी चिथावणीखोर भाषण केली. तलवारी गंजल्या आहेत, घासून ठेवा. त्याला दंगल घडवायची आहे. आमचे 56 टक्के मराठे आहेत, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. यावरून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला. 'चला उठा आयुष्याच्या मशाली पेटवा असे उदाहरण दिले, म्हणजे कायम मशाली पेटवून ठेवायच्या का? त्यांनी आता शाळेत जायला पाहिजे, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे. 


येवला येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, तुझे किती 56 टक्के असू दे किंवा 100 टक्के असू दे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही कुठे सांगितले तलवारी काढा? प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका, असे सांगण्यासाठी उदाहरणे दिली जातात. तुझ्याकडे तर पिस्तुलधारी आहेत. वाळू माफिया, अजून काय काय माफिया तुझ्या सोबत आहेत. तुझ्या आजूबाजूचे कार्यकर्ते शोधले तर अनेक जण सापडतील, असा पलटवार भुजबळांनी केला आहे.   


त्यांना शाळेत जाण्याची गरज


ते पुढे म्हणाले की, आम्ही आयडॉलॉजीमधून लढतो. भाषणातून अनेक उदाहरणे, उपमा देत आम्ही लढतो आहे. चला उठा आयुष्याच्या मशाली पेटवा असे उदाहरण दिले, म्हणजे कायम मशाली पेटवून ठेवायच्या का? त्यांनी आता शाळेत जायला पाहिजे. त्याला काय समजत नसेल, पण त्याने शाळेत जावे. तिथं समजेल की नाही हे देखील महत्वाचे आहे. पण त्यांना शाळेत जाण्याची गरज आहे. 


हे समजायला थोडं तरी शिक्षण लागतं


आपण भाषण करतो तेव्हा, अशा उपमा दिल्या जातात. त्याला समजणे शक्य नाही. त्यासाठी थोडे शिक्षण महत्वाचं असतं. लोकांना जागृत करण्यासाठी तसे बोलावे लागते.लेकरं बाळं, लेकरं बाळं म्हणून भावनिक करायचं. त्याच्या पलीकडे त्याला काही जमत नाही. आमच्याकडेही लेकरं बाळ आहेत. अन्याय कोणत्याही समाजावर होत असेल तर सर्वांनी एकत्र जावून त्याच रक्षण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ती शिकवण आहे. आम्ही शेरो शायरीतून, अभंगातून तशी उदाहरणे देत असतो. नाठाळाच्या माथी हाणू काठी, असा अभंग आहे. म्हणून आपण डोक्यात काठी मारत फिरतो का? पण हे समजायला थोडं तरी शिक्षण लागतं, असा टोला छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना लगावला. 


काय म्हणाले होते मनोज जरांगे? 


तलवारी गंजल्या आहेत, घासून ठेवा. त्याला दंगल घडवायची आहे. मात्र आपण शांत रहा. त्याने हत्यारे वाटायला सुरुवात केली आणि दंगल निर्माण व्हायला लागली तर आम्ही शांत बसणार नाही. तो चिथावणी देत असून लोकांना दंगली घडवायला तयार करत आहे. मुख्यमंत्री साहेब जर हे काही प्रयोग जर झाला तर आम्ही एक पाऊल मागे हटणार नाही. ही राज्यासाठी गंभीर बाब असून शांततेची बाब नाही. आम्ही उत्तराला उत्तर देणार आहोत, अशी टीका मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil: मराठा जात संकटात, मी एकटा पडलोय; 6 तारखेपर्यंत सगळी कामं उरकून घ्या; मनोज जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन