नाशिक : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृती (Manusmriti) दहन करण्याच्या आंदोलनात अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडले. यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजप (BJP) जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. भुजबळांनी पाठींबा देण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले. आता यावर छगन भुजबळ यांनीही हसन मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिले आहे. 


छगन भुजबळ म्हणाले की, ते सिनियर आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. जितेंद्र आव्हाडांवर काय टीका करायची ती करा. पण टीका करायचा अधिकार तुम्हाला कधी येतो, तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तो अधिकार येईल. मनुस्मृती ठेवतात बाजूला अन् जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड सुरू केलंय. त्यांना काय शिक्षा करायची ती शिक्षा करा. 


सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार - छगन भुजबळ


माझं काहीही म्हणणे नाही. पण जे तुम्ही करणारे, बोलणारे आहात. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम आहे. मला मान्य आहे ते, असलेच पाहिजे. बाबासाहेबांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे. ती शालेय शिक्षणात येता कामा नये एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार, असे त्यांनी म्हटले आहे. 


काय म्हणाले हसन मुश्रीफ?


हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडणं हे निंदनीय आहे. पण, आमचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले, ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना या संदर्भात खडेबोल सुनावले पाहिजे होते. ती कृती अत्यंत चुकीची आहे, याबाबत आपण बोललं पाहिजे होतं, असे त्यांनी म्हटले. 


इतर महत्वाच्या बातम्या