नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे छगन भुजबळ हे रुग्णालयातून विशेष विमानाने नाशिकला दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये आज विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याने छगन भुजबळ मुंबईतून नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकचे कार्यक्रम आटोपून छगन भुजबळ पुन्हा मुंबईत येऊन हॉस्पिटल मध्ये दाखल होणार आहेत. 


एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून त्र्यंबकरोड येथे दूध डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे. 


महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाचे लोकार्पण 


छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरहरी झिरवाळ, दादा भुसे, गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. कार्यक्रम आटोपून छगन भुजबळ पुन्हा मुंबईत जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत.  


देवेंद्र फडणवीसांचा होणार सत्कार 


तर नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गंगापूररोड पंपिंग स्टेशन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडणाऱ्या स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे महाकवी कालिदास कलामंदिर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार व कृतज्ञता सोहळा होणार आहे. याप्रसंगी ध्वजारोहण, श्रीमूर्तीपूजन, संतपूजन, कृतज्ञता सोहळा, धर्मसभा, महाप्रसाद आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.


आणखी वाचा 


ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंत्री छगन भुजबळ यांचे सूतोवाच