नाशिक : सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊन ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला त्यांच्याच पक्षातून अंतर्गत विरोध होताना दिसत आहे. सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी ठाम विरोध दर्शवला आहे. ज्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत, ज्यांचे संबंध दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत आहेत अशा बडगुजर यांना पक्षात घेऊ नये अशी मागणी सीमा हिरे यांनी केली. त्यामुळे येत्या दोन दिवसात नाशिकमध्ये राजकारण तापणार असल्याचं चित्र आहे.
खासदार संजय राऊत यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत आपण नाराज असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. पण बडगुजर यांना पक्षात घेण्याला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी विरोध दर्शवला आहे.
Seema Hiray Allegation On Sudhakar Badgujar : बडगुजर यांच्यावर 17 गुन्हे, सीमा हिरेंचा आरोप
आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, बडगुजर भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत असे बातम्यांमधून कळाले. आमच्यामध्ये असा कोणताही विषय नाही, चर्चा नाही. मी बडगुजर यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना बडगुजर यांनी त्रास दिला. आमच्या नेत्यांवर त्यांनी आक्षेपार्ह टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे याच्या बाबतींत चुकीची बातमी दिली. तसेच नारायण राणे यांना भरल्या ताटावरून त्यांनी अटक करायला लावली. अशा व्यक्तीला पक्षात घेऊ नये अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे.
Seema Hiray Vs Sudhakar Badgujar : भाजपमध्ये आल्यानंतर पवित्र होऊ असं वाटत असेल
बडगुजर यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर त्यांचे संबंध आहेत. त्यांचा मुलगा एका गोळीबार प्रकरणी अडकला होता. या सर्वामध्ये त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून ते भाजपमध्ये येत असतील असं सीमा हिरे म्हणाल्या. त्यांच्यावर गुन्हे आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये येत असावते. भाजपमध्ये आलो म्हणजे पवित्र होऊ असे त्यांना वाटत असेल. पण आमचा त्यांना विरोध कायम आहे.
सीमा हिरे म्हणाल्या की, "सुधाकर बडगुजर हे मनपाच्या प्रत्येक टेंडरमध्ये सहभागी आहेत. ते ज्या पक्षात होते त्यांच्यामुळे अनेकांनी पक्ष सोडला. त्यामुळे अशा लोकांना आमच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. आमचे वरिष्ठ असा निर्णय घेणार नाहीत. बडगुजर यांची प्रतिमा मलिन आहे. त्यांना किती मते मिळाली? त्यामुळे त्यांना घेताना पक्षनेते दहा वेळा विचार करतील."