पुणे : दोन दिवसांपूर्वी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे म्हणत थेट धमकीच दिली. शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू असलेल्या कीर्तनावेळी काही जणांनी राजकीय भाष्य करत असल्याचा आक्षेप घेत गोंधळ घातला. यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम भंडारे यांचं समर्थन केलं आहे. कीर्तनकार संग्राम बापू महाराज यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाम पाठींबा दिला आहे.
काही लोकांना मात्र त्यांच्या परखड भूमिकेचा राग
मालेगावमध्ये बोलताना पडळकरांनी म्हटलं की, संग्राम बापू लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांबाबत समाजाला सावध करत असून धर्मांतराच्या मुद्द्यावर ते परखडपणे मते मांडत आहेत. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेचे आम्ही समर्थन करतो, असे पडळकर यांनी स्पष्ट केले. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “संग्राम बापू महाराज हे कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करतात. त्यांची भूमिका एकदम रास्त असून, समाजात परिवर्तन घडावे आणि जागृती व्हावी यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कीर्तनावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. काही लोकांना मात्र त्यांच्या परखड भूमिकेचा राग आहे. जिथे जिथे उमेदवार पराभूत झाले, त्या लोकांमध्ये संग्राम बापूंविषयी रोष निर्माण झाला आहे.”
त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांना सावधगिरीचा इशारा मिळतोय
पडळकर यांनी पुढे सांगितले की, संग्राम बापूंनी जेव्हा धर्मरक्षणाची बाजू मांडली तेव्हा समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल आदर आणि विश्वास वाढला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांना सावधगिरीचा इशारा मिळतोय, हीच खरी समाजसेवा आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, संग्राम बापू महाराज यांच्या कीर्तनादरम्यान काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा गोपीचंद पडळकर यांनी जाहीर निषेध केला आहे. “कीर्तन हा समाजप्रबोधनाचा एक पवित्र मार्ग आहे. त्या ठिकाणी गोंधळ घालणे म्हणजे हिंदू संस्कृतीचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.
संग्राम बापूंची भूमिका एकदम रास्त आहे. कीर्तनकारांवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. समाजाचे परिवर्तन व्हावे, समाजाची जागृती व्हावी यासाठी संग्राम बापू महाराज हे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहे. काही लोकांना त्यांची भूमिका खटकते. संग्राम बापूंनी भूमिका घेतल्याने लोकांमध्ये जनजागृती झाली. जिथे जिथे उमेदवार पराभूत झाले त्या लोकांना त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाला आहे. संग्राम बापूंची भूमिका ही धर्मरक्षणाची आहे. त्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो. त्यांच्या कीर्तनात ज्यांनी गोंधळ घातला त्यांचा मी जाहीर निषेध करतो, असंही पडळकरांनी म्हटलं आहे.