Raj Thackeray : आदिवासी आश्रमशाळेत काम करणाऱ्या तासिका शिक्षकांसह रोजंदारी कर्मचार्यांना कायमस्वरूपी करा, तसेच बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी गत आठ दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या बिऱ्हाड संघर्ष आंदोलनकर्त्यांनी आता राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांच्या नेतृत्वाखाली 50 आंदोलनकत्यांचे शिष्टमंडळ आज गुरुवारी (दि. 17) मुंबईत राज ठाकरेंना भेटणार आहे. आंदोलनाची सविस्तर माहिती देत भरतीप्रक्रियेवर तोडगा निघावा, यासाठी त्यांच्याकडून हस्तक्षेपाची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली. मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा, यासाठी राज ठाकरे यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आंदोलकांना काय दिलासा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अनेक नेत्यांची आंदोलनाला भेट
दरम्यान, बुधवारी (दि. 16) माजी आमदार जे. पी. गावित आणि कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. जे. पी. गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, काँग्रेस नेते लकी जाधव, राजू देसले यांच्यासह विविध नेत्यांनी देखील आंदोलकांची भेट घेतली आहे. मात्र, शासनाने पात्रताधारक उमेदवारांचीच कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल, असे स्पष्टपणे सांगितल्याने आंदोलनकर्त्यांचा विरोध अधिक तीव्र होत चालला आहे.
पोलीस बंदोबस्त कायम
आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासून आदिवासी आयुक्तालयासमोर पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असून, पोलीस कर्मचारी 12 तास तैनात आहेत. आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रशासकीय यंत्रणेलाही मोठ्या प्रमाणावर तणावाचा सामना करावा लागत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या