नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेला (Jansanman Yatra) आज नाशिकच्या दिंडोरीत (Dindori) सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे. मात्र जनसन्मान यात्रेच्या पहिल्या मेळाव्यासाठी जात असताना दिंडोरीत पावसाने झालेल्या चिखलामुळे अजित पवारांसह नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दिंडोरी तालुक्याला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसामुळे दिंडोरीत अनेक ठिकाणी चिखल झाल्याचे दिसून येत आहे. आज जनसन्मान यात्रेचा पहिला मेळावा दिंडोरीत पार पडत आहे. यासाठी अजित पवार, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह राष्ट्रवादीतील प्रमुख नेते दिंडोरीत दाखल झाले आहेत.
चिखलामुळे नेत्यांची तारांबळ
दिंडोरीत जन सन्मान यात्रेच्या मेळाव्याच्या ठिकाणी चिखल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनसन्मान यात्रेच्या पहिल्या मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी जात असताना नेतेमंडळींना चिखलाचा सामना करावा लागला. यावेळी छगन भुजबळ हे चिखलातून वाट काढत कार्यक्रम स्थळी पोहोचले. तर चिखल पाहून अजित पवार मागे थांबले होते. त्यानंतर अजित पवारांसाठी गाडी मागवण्यात आली. अजितदादा गाडीत बसून कार्यक्रम स्थळी गेले. यावेळी अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी गाडीतून कार्यक्रमस्थळापर्यंत प्रवास केला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी झालेल्या चिखलामुळे नेत्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
गोकुळ झिरवाळांची जनसन्मान यात्रेकडे पाठ
दरम्यान, नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. आजच्या यात्रेला गोकुळ झिरवाळ उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी मी शरद पवार यांच्या सोबत असून आगामी निवडणुक लढण्याचे देखील त्यांनी संकेत दिले आहेत. यामुळे आता गोकुळ झिरवाळ यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आता गोकुळ झिरवाळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या