Aaditya Thackeray : गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची आहे. रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसलंय, अशी घणाघाती टीका ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) केली आहे. नाशिकमध्ये आज (दि. 16) शिवसेना ठाकरे गटाचे एक दिवसीय निर्धार शिबिर (Shiv Sena UBT Nirdhar Shibir) आयोजित करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्र कुठे चाललाय? या विषयावर भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.   

अदित्य ठाकरे म्हणाले की, ईशान्य मुंबईनंतर इथे शिबीर होतंय, आपण खरंतर मैदानातील माणसं आहोत. पण दिशा ठरविण्यासाठी आपली वाटचाल ठरविण्यासाठी जिल्ह्यात, विभागात असे शिबीर झाले पाहिजे. मी काय विषयावर बोलायचे असे राऊत यांना विचारले. संजय काका मी बोलायचे काय तर म्हणाले महाराष्ट्र कुठे चाललाय? या विषयावर बोला. मी बाळासाहेब ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत लहानपणीपासून दौऱ्यावर जायचो. आजवर आपल्या मुख्यमंत्र्‍यांचे पहिले 100 दिवस हनिमून पिरेड म्हटले जात होते. या सरकारच्या काळात पहिल्या 100 दिवसात काय झाले ते बघा, एक तरी योजना आली का? या सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? तरुण-तरुणींसाठी एकतरी चांगली योजना आणली आहे का? लाडकी बहीण योजना आता 500 रुपयांवर आणली. आम्ही तर 3 हजार देणार होतो. एकही गोष्ट बजेटमध्ये आणत नाही, याला निर्लजपणा म्हणतात. याच्या पैकी कोणीतरी कोर्टात जाईल आणि कोर्टातून योजना बंद पाडतील. हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसलंय

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, पुण्यात बलात्कार झाला. गृहराज्य मंत्री म्हणतात शांततेत पार पडलं, म्हणून कोणाला काही कळलं नाही म्हणतात.  लाखो महिला लाडकी बहीण योजनेतून कमी केल्यात,  हे सरकार तुमचं आहे वाटतं का? गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची आहे.  रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसलंय. बीड, परभणीचे प्रकरण झाले. बीडचा आका कोण आहे? हे सर्वांना माहिती आहे. फोटो समोर आल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. काय अशी मैत्री होती की? मुख्यमंत्री स्वतःच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नाही. भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या होते आणि त्याला न्याय देता आला नाही, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याच्याकडून न्याय मागणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे,  असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणूक नसताना कर्जमाफी देणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महिलांवर अत्याचार होत असल्याच्या विरोधात सर्वात कडक शक्ती कायदा आणणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत नाही आणि कृषिमंत्री काय म्हणतात? कृषिमंत्री हे बाद झाले पाहिजे होते. ते निर्लजपणा करत आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री दावोसला गेलेत, गुंतवणूक आणली सांगितले. मग तिजोरीत खडखडाट का आहे? नाशिकमधे स्मार्ट सिटी योजना पूर्ण झाली का? सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना सुरू आहे. जात धर्म, तालुका जिल्हा आशा वादात व्यस्त ठेवले जात आहे. मूलभूत वर्षांपासून लक्ष विचलित करण्यासाठी तुम्हाला व्यस्त ठेवले जात आहे. 

वॉशिंग मशिनमधून भ्रष्टाचारी धुतले जातात आणि मंत्रिपद दिले जाते

ब्रिटीश नीतीप्रमाणे तोडा, फोडा  आणि राज्य करा, असा राज्य कारभार केला जातोय. 2014 ला विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढली. काळा पैसा परत आणणार होते, बुलेट ट्रेन आणणार होते, स्किल इंडिया आणणार होते, 10 पट भ्रष्टाचार वाढला आहे, भाजपच्या वॉशिंग मशिनमधून भ्रष्टाचारी धुतले जातात आणि मंत्रिपद दिले जाते. चीन पाकिस्तानवर पंतप्रधान बोलत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

आणखी वाचा 

Sanjay Raut on Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे हिंदुत्त्वाचा मूर्तिमंत चेहरा, ते शिवसेनेचे शंकराचार्य; संजय राऊतांची खैरेंवर स्तुतीसुमनं, 'आम्ही इथेच' चर्चासत्रात नेमकं काय घडलं?