नाशिक : शहरातील कन्नमवार पुलावरुन पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करत असताना पतीने उड्डाण पुलावरून उडी घेत स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने ही टोकाची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास आडगाव पोलीस करत आहेत. नाशिकमधील (Nashik) या घटनेनं पुलावरुन प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती.
पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या पतीने धावत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपोवन परिसरातील कन्नमार पुलावरून उडी घेत आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करणाऱ्याचे नाव चेतक पवार असून चेतकने बायकोसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे बोललं जात आहे. चेतकच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी देखील उड्डाण पुलावरून खाली आली आणि रडायला लागली अशी माहिती मिळाली आहे. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले असून पतीच्या मृतदेहाशेजारीच पत्नी रडताना दिसून येते. घटना घडल्यानंतर येणारे-जाणाऱ्या वाहनचालकांनी पुलावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. ज्या रिक्षात बसून चेतक आपल्या पत्नीसोबत प्रवास करत होता, त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, चेकला गंभीर दुखापत झाल्याने अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून चेतकने आत्महत्या का केली याचा तपास आडगाव पोलीस करत आहे.