Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) सिन्नर (Sinnar) येथून अपहरण झालेला चिराग कलंत्री हा बारा वर्षांचा मुलगा सुखरुप घरी परतला असून दुचाकीवर येत मुलाला घराजवळ सोडून संशयित फरार झाले आहेत. सिन्नर पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध सुरु आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ही धक्कादायक गुरुवारी (5 जानेवारी) घटना घडली असून येथील काळेवाडा परिसरात घराजवळ खेळणाऱ्या चिराग कलंत्री या 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ओम्नी गाडीतून आलेल्या काही संशयितांनी चिरागला बळजबरी गाडीत बसवत पळवले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान नाशिकसह नगर मार्गावर नाकाबंदी करत पोलिसांची तपासणी सुरु करण्यात आली होती. संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. मात्र मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास म्हणजेच जवळपास पाच तासानंतर चिराग परतला असून संशयितांनीच चिरागला दुचाकीवरुन पुन्हा घरी सोडले आहे. त्यामुळे कलंत्री कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नाशिक शहरातून अपहरणाच्या घटना समोर आहेत असताना सिन्नर शहरातून उद्योजक असलेल्या सुरेश कलंत्री यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
घटना काय घडली होती?
सिन्नर शहरातील वावी वेस परिसरातून काल सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. चिराग सुरेश कलंत्री असे या बालकाचे नाव आहे. चिराग आपल्या मित्रांसोबत सायंकाळी हा घरासमोरील काळे वाड्या समोरील मोकळ्या जागेवर खेळत होता. यावेळी घराजवळून सफेद रंगाच्या ओम्नी कारमधून आलेल्या काही संशयितांनी चिरागला ओढून गाडीत टाकत पळ काढला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही ओम्नी कार जाताना दिसली होती.
पैशांचीही मागणी
दरम्यान संशयितांनी चिरागचे अपहरण केल्यानंतर यातील दोन संशयितानी काळ्या रंगाची पॅन्ट आणि डोक्यात गुलाबी रंगाची टोपी तसंच तोंडाला काळ्या रंगाचे मास्क घातले असल्याचे प्रत्यशदर्शीच्या बोलण्यावरुन समजले. अपहरणाच्या काही वेळानंतर चिरागच्या आईला एका नंबरवरुन फोन आला असता त्यांनी पैसे तयार ठेवण्याचे सांगितले. पुन्हा फोन करतो असे सांगून ठेऊन दिल्याचे समजत आहे. त्यानंतर रात्री उशिरा चिरागला घरासमोर संशयिताकडून सोडण्यात आले. त्यामुळे चिरागचं अपहरण करण्यामागचा उद्देश काय हे संशयितांना अटक करुन त्यांच्या चौकशीनंतरच समोर येईल.
संबंधित बातमी
Crime News: नाशिकमध्ये उद्योजकाच्या मुलाचे अपहरण, पोलिसांकडून शोध सुरू